
चोवीसपेक्षा जास्त आठवड्यांच्या गर्भपातासाठी वैद्यकीय मंडळ
पुणे, ता. ६ : राज्यात २४ आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांच्या गर्भपातासाठी आतापर्यंत न्यायालयात जावे लागत होते. पण, आता या न्यायालयीन प्रक्रियेऐवजी वैद्यकीय मंडळाची नवीन व्यवस्था उभारण्यात आली आहे.
कायद्याने २४ आठवड्यापर्यंतच्या गर्भपाताला मान्यता दिली आहे. परंतु त्यापेक्षा जास्त आठवड्यांच्या गर्भपाताला आता वैद्यकीय मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्याला वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) नियम २०२१ असे म्हटले आहे. त्या बाबतची अधिसूचना केंद्राच्या राजपत्रात १२ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे. राज्यात या संबंधातील अधिसूचना ‘कुटुंब कल्याण, माता बालसंगोपन आणि शालेय आरोग्य’ विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केली.
२४ आठवड्यांपर्यंतच्या गर्भामध्ये व्यंग असेल किंवा इतर वैद्यकीय कारणांच्या आधारे अधिकृतपणे गर्भपात करता येतो. मात्र २४ पेक्षा जास्त आठवड्यांच्या गर्भात व्यंग आढळल्यास अधिकृत केंद्रांवरही गर्भपात करता येत नव्हता. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया बंधनकारक होती. तेथील निर्णय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे २४ पेक्षा जास्त आठवड्यांच्या गर्भपात वैद्यकीय मंडळाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
गर्भपातासाठी अर्ज आल्यानंतर गर्भवतीच्या वैद्यकीय अहवालाचे परीक्षण करून तीन दिवसांत निर्णय कळविण्याचे बंधन या मंडळावर घातले आहे. अर्ज केल्यापासून मान्यता मिळून वैद्यकीय गर्भपात ही प्रक्रिया समुपदेशनासह पाच दिवसांमध्ये पूर्ण झाली पाहिजे. ते करत असताना खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत का, हे देखील तपासण्याचे अधिकार मंडळाकडे सोपवले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13075 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..