पंचनामा असा कसा मी विसराळू... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचनामा
असा कसा मी विसराळू...
पंचनामा असा कसा मी विसराळू...

पंचनामा असा कसा मी विसराळू...

sakal_logo
By

पेशंट : डॉक्टरसाहेब, तब्येत कशी आहे?’’
डॉक्टर : आता बरी आहे पण पावसात थोडं भिजलं तरी सर्दी होते आणि डोकं दुखतं. (एकदम आठवल्यागत) मी डॉक्टर आहे का तुम्ही?, माझ्याकडे तुम्ही तब्येतीची तक्रार घेऊन आलाय ना? मग मलाच काय तब्येतीविषयी विचारता?
पेशंट : अहो मला कोणी भेटलं की त्याच्या तब्येतीची चौकशी करायची मला सवय आहे.
डॉक्टर : कामाचं बोला.
पेशंट : मी पायजमे अॅंड सन्स कंपनीत सुपरवायझर आहे. सकाळी आठ ते दुपारी चार अशी माझी ड्यूटी असते. नाही नाही दुपारी चार ते सकाळी आठ अशी ड्यूटी असते.
डॉक्टर : कामाचं बोला म्हणजे तुमच्या कामाविषयी बोला, असं नाही. तुम्ही माझ्याकडे का आलात, ते सांगा. पेशंट : बायको म्हणाली, की जरा पाय मोकळे करून या.
डॉक्टर : (संतापून) म्हणजे तुम्ही पाय मोकळे करण्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये आलाय का? आधी बाहेर व्हा. पेशंट : अहो, चालण्यासारखा व्यायाम नाही, असं सगळे डॉक्टर सांगतात की नाही. मग मी तो करतो, असं सांगितलं तर लगेच तुम्ही मला बाहेर काढायला लागलाय.
डॉक्टर : (संयम ठेवून) तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलाय, तेवढं थोडक्यात सांगा.
पेशंट : बरेच दिवस झाले, तुमची गाठभेट नाही म्हणून म्हटलं जरा ख्यालीखुशाली विचारावी. तुमच्या सोनमचं लग्न झालं की नाही? आणि त्या सातपुतेला उसने पैसे देऊ नका. नाहीतर बुडालेच म्हणून समजा.
डॉक्टर : (चिडून) तुम्ही माझी काय चेष्टा चालवली काय? कोण सोनम? कोण सातपुते? यांना मी ओळखतही नाही.
पेशंट : काय विश्वासराव तुम्ही! स्वत:च्या मुलीचं नावही तुमच्या लक्षात नाही का? आणि सातपुते म्हणजे आपला कॉमनमित्र हो.
डॉक्टर : (संयमाने) हे पहा माझं गेल्यावर्षीच लग्न झालंय. मला अजून मूलबाळ नाही आणि तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाच्या गोष्टी काय करता. दुसरं म्हणजे माझं नावही विश्वासराव नाही. आधी बाहेरची पाटी वाचून या. तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये आला आहात. तुम्हाला काय त्रास होतो, हे सांगा.
पेशंट : मला बायकोचा फार त्रास होतो. अजून...
डॉक्टर : तुम्ही घरगुती त्रास सांगू नका. शारीरिक त्रासाविषयी सांगा म्हणजे मला उपचार करणे सोपे होईल.
पेशंट : मला विस्मरणाचा त्रास खूप होतो. म्हणजे मी कोठे आलोय? कोठे चाललोय? कोणाशी बोलतोय? काय बोलतोय? हेच माझ्या लक्षात येत नाही.
डॉक्टर : तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं ते. बरं हा त्रास कधीपासून होतोय?
पेशंट : कसला त्रास? मी एकदम फीट आहे.
डॉक्टर : तुम्हाला विस्मरणाचा त्रास आहे ना?
पेशंट : नाही हो. कोणी सांगितलं. बायकोनं मला येताना अर्धा किलो वांगी आणायला सांगितली आहेत. बघा माझ्या लक्षात आहे की नाही?
डॉक्टर : अच्छा! तुमच्या हातावर, मनगटावर पेनने काय लिहिलंय?
पेशंट : अहो, निरोप व महत्त्वाच्या गोष्टी मी विसरू नये, म्हणून मी ते लिहून ठेवलंय.
डॉक्टर : अहो, याचाच अर्थ तुम्हाला विस्मरणाचा त्रास आहे.
पेशंट : मघापासून तेच मी तुम्हाला सांगतोय. मला विस्मरणाचा फार त्रास होतोय. काहीतरी चांगलं औषध द्या. (त्यानंतर डॉक्टरांनी पेशंटला चिठ्ठी दिली. तीन तासांनी पेशंट घामाघूम होऊन परत क्लिनिकमध्ये आला.)
पेशंट : डॉक्टरसाहेब, तुम्ही लिहून दिलेली औषधे कोणत्याच मेडिकलमध्ये मिळत नाहीत. तीन तासांपासून आख्खं शहर मी पालथं घातलं.
डॉक्टर : अरेच्चा! चिठ्ठीवर तर मी फक्त सहीच केली आहे. औषधांची नावे लिहायची विसरूनच गेलो. मलाही विस्मरणाचा त्रास आहे हो.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13123 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..