पावसामुळे कोरोना लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे कोरोना लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट
पावसामुळे कोरोना लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट

पावसामुळे कोरोना लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसाचा थेट फटका कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रांना बसल्याचे दिसते. दररोज चार ते पाच हजार पुणेकर वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेत होते. ते प्रमाण आता एक हजार ३०० पर्यंत आल्याचे निरीक्षण महापालिकेच्या लसीकरण विभागातर्फे नोंदविले आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. राज्यात १७ हजार ५६७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सहा हजार ४११ (३६.४९ टक्के) रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. या पार्श्वभूमिवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. मात्र, शहरात कोरोना लसीकरण केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे.
‘‘कोरोनाची संख्या वाढू लागल्याने शहरातील वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवरील गर्दी वाढू लागली होती. मात्र, गेल्या दोन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने लसीकरण केंद्रांवर येणाऱ्यांची संख्या कमी झाली,’’ असे निरीक्षण महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी नोंदविले.
महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘शहरात सरासरी चार ते पाच हजार दररोज लसीकरण होत होते. पण, पावसामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी झाले. शहरात मंगळवारी (ता. १२) एक हजार ३३५ नागरिकांनी लस घेतली. ज्या नागरिकांचा दुसरा आणि बूस्टर डोस राहिला आहे, त्यांनी तातडीने लसीकरण केंद्रावर येऊन घ्यावा. कोणत्याच लसीचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी ही लस घ्यावी.’’

कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. घरात पाच पैकी तिघांना सर्दी, ताप, खोकला आहे. या वातावरणात कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता वाटते. तसेच, मुलाचाही लसीचा दुसरा डोस देण्याची वेळ आली. पण, पावसामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी असते. वाहतूक कोंडी ठिकठिकाणी झालेली दिसते. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पावसाची उघडीप झाल्यानंतर लस निश्चित घेऊ.
-आरती जोशी, मयूर कॉलनी

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक लस उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना लस घेतल्याने संसर्ग झाल्यानंतरही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. लशीमुळे कोरोनातील गुंतागुंत वाढत नाही, त्यामुळे लस घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
-डॉ. आनंद कदम, वैद्यकीय तज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13132 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top