
विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी केंद्र पोचले शाळेत
पुणे, ता. १४ : शहरातील पालक त्यांच्या मुलांना घेऊन लसीकरण केंद्रांपर्यंत येण्याची वाट न बघता महापालिकेने पुढाकार घेऊन लसीकरण केंद्र शाळांमध्ये पोचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील २० शाळांमध्ये हे लसीकरण केंद्र सध्या पोचले असून, त्या माध्यमातून मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असली तरीही अत्यवस्थ होणाऱ्या आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प होती. त्यामागे पुण्यात मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण हे एक महत्त्वाचे कारण असल्याचा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे.
याबाबत लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, “शहरात १६ मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. या विद्यार्थ्यांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येत आहे. तसेच, १५ ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध केली आहे. या दोन्ही लशीचा मुबलक साठा महापालिकेकडे आहे. त्यामुळे या वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला लस मिळावी, यासाठी शहरातील २० शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत तीन हजार ८०२ विद्यार्थ्यांना लस देण्यात यश आले आहे. त्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७०९ आणि १२ ते १४ वर्षे वयोगटातील तीन हजार ९३ विद्यार्थांचा समावेश आहे.”
कोथरुडमधील एमआयटी स्कूलमधील विद्यार्थ्याचे पालक अश्विनी बारटक्के म्हणाल्या, “कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुलांना शाळेत जाताना मास्क, सॅनिटायझर देतो. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचनाही वेळोवेळी सगळे पालक आणि शिक्षक देत असतात. पण, लस हा कोरोना प्रतिबंधक करण्यासाठी प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे पूर्ण लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.”
दृष्टीक्षेपात शहरातील लसीकरण
वयोगट (वर्षांमध्ये) ........... पहिला डोस ........ दुसरा डोस
१२ ते १४ ....................... ३३,३४९ .............. २०,६७५
१५ ते १८ ....................... १,१७,२६८ ........... ७७,४४८
१९ ते ४५ ....................... २४,०१,०२३ ......... १९,४३,४७२ (८७,६०७ बूस्टर)
४५ ते ६० ........................ ६,५३,७४८ .......... ५,८९,१७८ (५१,२३४ बूस्टर)
६० पेक्षा जास्त ................ ४,९३,४३८ .......... ४,५०,७३३ (१,६४,६७९ बूस्टर)
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13133 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..