
अमरावती जिल्ह्यात कॉलराचा उद्रेक
पुणे, ता. १३ : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कॉलराचा अमरावती जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या उद्रेकात आतापर्यंत १८१ रूग्ण आढळले असून, यामध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि अमरावती तालुक्यात ७ जुलैपासून कॉलरा उद्रेक सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी आणि घाना या तीन गावांमध्ये तर अमरावती तालुक्यातील नया अकोला या गावांमध्ये सध्या कॉलरा उद्रेक सुरू आहे. आतापर्यंत या उद्रेकामध्ये १८१ रुग्ण आढळले आहेत. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन स्त्रिया आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील तीन रुग्ण हे २४ ते ४० वर्षे या वयोगटातील तर दोघांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे, असे डॉ. आवटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उद्रेक झालेल्या गावांमध्ये वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहेत. पाण्याच्या गुणवत्तेची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. पाण्याची गुणवत्ता सनियंत्रण केली जात असून, रुग्ण सर्वेक्षण, उपचारासाठी आवश्यक व्यवस्था, लोकशिक्षण याद्वारे उद्रेक नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. उद्रेकाची पाहणी आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी राज्यस्तरीय पथक अमरावती येथे पोचले असून अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांनी या उद्रेकाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्रेक नियंत्रणाबाबत आवश्यक निर्देश दिले आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13136 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..