आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आग रामेश्वरी, 
बंब सोमेश्वरी...
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी...

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी...

sakal_logo
By

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काय करावे, या विचाराने वाहतूक विभागाचे उपायुक्त दिलीपराव खापरेसाहेब वैतागून गेले होते. वाहनचालकांकडून कितीही दंड वसूल करा, नियमितपणे सिग्नल यंत्रणा सुरू राहील, याची काळजी घ्या, चौका-चौकातील पोलिसांनी कोंडाळे करुन गप्पा न मारता, वाहतूक नियमनावर भर दिला, तरीही वाहतुकीला शिस्त लागत नव्हती. उलट काही बिलंदर व्यक्ती नेतेमंडळींची नावे सांगून तर काहीजण वाद-विवाद करून सुटका करून घेत होती. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न काही सुटत नव्हता.
काही दिवस त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगून ‘गांधीगिरी’ केली होती. नियम मोडणाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊ लागले होते पण काहींनी पोलिसांकडील अशी गुलाबाची फुले गोळा करून, दुसऱ्या चौकात विकायला सुरवात केली होती. तर काहीजण ‘साहेब, अजून एक फूल द्या की. दोघींना तरी देता येईल,’ अशी मागणी केली होती. फुकट फुले मिळत आहेत म्हणून अनेकजण मुद्दाम नियमही मोडू लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ‘गांधीगिरी’ला त्यांनी रामराम ठोकला होता. बेफाम वाहतुकीला आळा घालण्यासाठी मोकाट जनावरे रस्त्यावर सोडण्याचा प्रयोगही त्यांनी गुपचूपपणे अमलात आणला. त्यामुळे बेफाम गाड्या चालविणाऱ्यांना ‘ब्रेक’ लागला होता. मात्र, काही दिवसांनी महापालिकेनेच मोकाट जनावरे पकडून नेल्याने हा प्रयोगही त्यांना थांबवावा लागला होता. वाहनचालक कशालाही अगदी पोलिसांनाही जुमानत नसल्याचे पाहून, खापरेसाहेबांच्या चिंतेत भर पडली. एकदा ते कार्यालयात जात होते. त्यावेळी काहीजण अचानक थांबले व चार-पाच पावले माघारी फिरून परत जाऊ लागले तर काहीजण जागीच थांबले. समोर सिग्नल नसतानाही लोकं अचानक थांबल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सूर्य पश्चिमेला उगवला की काय, अशी शंका त्यांना आली. त्यांनी समोर बघितले तर दोन-तीन मांजरी रस्ते ओलांडीत असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी आनंदाने चुटकी वाजवली. ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी तातडीने बैठक बोलावली. ते म्हणाले, ‘‘शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. सिग्नल लागलेला असतानाही वाहनचालक सुसाट सुटतात, ही गंभीर बाब आहे. आपल्या खात्याचा त्यांच्यावर वचक राहिला नाही, हेच यातून दिसते. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आपण प्रत्येक सिग्नलला चार-पाच प्रशिक्षित मांजरे ठेवणार आहोत. सिग्नल लागल्यानंतर ही मांजरे रस्त्यावरून आडवी फिरतील. त्यांना बघून वाहनचालक आपोआप थांबतील. त्यामुळे आपला उद्देश साध्य होईल. मात्र, आपला व त्या मांजरांचा काही संबंध नाही, हे दाखवून द्यायचे. नाहीतर ‘वाहतूक पोलिसांकडूनच, अंधश्रद्धेला खतपाणी’ अशा बातम्या येतील.’’ खापरे साहेबांनी असं म्हटल्यावर बैठकीत शांतता पसरली. कोणाला काही शंका आहेत का? त्यांनी विचारले. ‘‘साहेब, मांजरांना सांभाळणे, त्यांना दूध देणे, खायला देणे ही कामे कोणी करायची?’’ एका पोलिसाने विचारले.
‘‘अर्थात आपणच. मांजरांमुळे तुमच्यावरील कामाचा ताण कमी होणार नाही का? त्यामुळे ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनीच चोरून ही कामे करायची आहेत. शिक्षक जसे शालाबाह्य कामे करतात, तसेच आपणही हे ड्युटीबाह्य काम आनंदाने करायचे आहे.’’ खापरेसाहेबांचे बोलणे ऐकून अनेकांनी मांजरांप्रमाणे डोळे मिटून घेतले. तर काही जणांना वाहतूक नियमनाचे काम सोडून, आठ-दहा मांजरांना आपण सांभाळत असल्याचे दृश्य दिसू लागले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13495 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..