अखेर ‘नकोशी’मुळेच आयुष्य झालं हवं-हवंस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर ‘नकोशी’मुळेच 
आयुष्य झालं हवं-हवंस
अखेर ‘नकोशी’मुळेच आयुष्य झालं हवं-हवंस

अखेर ‘नकोशी’मुळेच आयुष्य झालं हवं-हवंस

sakal_logo
By

अनाथाश्रमातील महिलेला तपासल्यानंतर डॉक्टर आरतीने त्यांना पथ्यपाणी समजावून सांगितले. फाईलवरील अनुराधा सुरेश सोनवणे हे नाव वाचून आरतीला आश्चर्याचा धक्का बसला.
‘‘तुम्ही यापूर्वी राहायला कोठे होतात?’’ आरतीने विचारले.
‘‘जगताप चाळीत.’’
‘‘तुम्हाला किती मुले आहेत?’’ आरतीने विचारले.
‘‘तीन मुली आणि एक मुलगा.’’ आवंढा गिळत अनुराधाबाईंनी उत्तर दिले.
‘‘मग तरीही तुम्ही अनाथाश्रमात का राहताय?’’ आरतीने कुतूहलाने विचारले.
‘‘तिन्ही मुली लग्न होऊन सासरी गेल्या. परिस्थितीमुळे मुलींना फार शिकवता आलं नाही. त्यामुळं त्यांना स्थळंही बेताचीच मिळाली. एक मुलगी पुण्यात धुणी-भांडी करते तर दोन मुली मुंबईत मिळेल ते काम करून जगतात. एकुलत्या एका मुलाला लाडा-कोडात वाढवला. पोटाला चिमटा घेऊन, त्याला शिकवला. मात्र, माझा नवरा गेल्यानंतर मुलाने चाळीतील खोली विकून मोठ्या सोसायटीत फ्लॅट घेतला आणि मला अनाथाश्रमाचा रस्ता दाखवला.’’ अनुराधाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते.
‘‘सत्तावीस वर्षांपूर्वी तुम्ही भवानीपेठेतील डॉ. स्नेहल अत्रे यांच्याकडे उपचारासाठी येत होतात का?’’ आरतीने विचारले.
‘‘हो. हो. ती डॉक्टरबाई लई चांगली होती. पैसे कमी पडले तरी राहू द्या, म्हणायची. ’’ अनुराधाबाईंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
‘‘माझ्या चौथ्या बाळंतपणासाठी मी त्यांच्याकडेच जायची. सोबत माझा नवरा आणि सासूही असायची. लागोपाठ तिन्ही मुलीच झाल्याने नवरा आणि सासू माझा खूप छळ करायचे. आता जर परत मुलगी झाली तर तुला आणि मुलीलाही मारून टाकेल, अशी धमकी त्यांनी मला दिली होती.’’ अनुराधाबाईंनी पदराने डोळे पुसले.
‘‘मी हे सगळं डॉक्टरबाईंना सांगितलं. त्यांचे पाय धरले. ‘मॅडम, कसंही करून, मला मुलगा झाला पाहिजे’. असं मी म्हटलं. त्यांनी माझी खूप समजूत काढली. नवऱ्यानं सोनोग्राफीचा आग्रह धरला. माझ्या सुदैवाने त्यामध्ये मुलगा असल्याचं डॉक्टरबाईंनी सांगितलं. मला खूप आनंद झाला. त्यानंतर सासू आणि नवऱ्याने माझे खूप लाड केले. बाळंतपणासाठी मी अत्रे मॅडमच्या दवाखान्यात अॅडमिट झाले. पण माझं दुर्दैव आड आलं. मृत बाळ जन्माला आलं असल्याचं डॉक्टरबाईंनी सांगितलं.’’ अनुराधाबाईंच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर माझ्या नवऱ्यानं आणि सासूनं दवाखाना बदलला. दीड वर्षाने तिथेही मला मुलगीच झाली. त्यामुळे तिला त्या दोघांनी मारून टाकली.’’ अनुराधाबाईंना हुंदका अनावर झाला.
‘‘पण मॅडम, तुम्हाला अत्रे मॅडमविषयी कसं काय माहिती?’’ अनुराधाबाईंनी विचारलं.
‘‘कारण तुमचं चौथं बाळ जन्मजात मृत नव्हतं. तर ती मुलगी होती. तुमचा नवरा आणि सासू तिला मारून टाकेल म्हणून अत्रे मॅडमने तुम्हाला खोटं सांगितलं होतं आणि ती मुलगी म्हणजे मीच आहे.’’ डॉक्टर आरतीच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागले.
‘‘आईऽऽ’’ असं म्हणून आरतीने अनुराधाबाईंना मिठी मारली.
‘‘माझी आई म्हणजे डॉ. अत्रे दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेली. मात्र, तिने मला सगळं सांगितलं होतं. मी जगताप चाळीत जाऊन तुमच्या सगळ्यांचा शोध घेतला पण त्या खोलीत वेगळंच कोणीतरी राहत होतं. ज्या मुलीला जन्मानंतर तुम्ही मारून टाकणार होता, तीच मुलगी आज अनेकांना नव्याने जन्म देतेय.’’ आरतीने असं म्हटल्यावर अनुराधाबाई रडू लागल्या.
‘‘आई, तुझी मुलगी डॉक्टर असताना तुला अनाथाश्रमात राहण्याची काही गरज नाही. आजपासून तू माझ्यासोबत कायमचं राहायचं.’’ असं म्हणून दोघीही एकमेकांच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंना मोकळी वाट करून देऊ लागल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13504 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..