चांदणी चौक : वाहतूक सुरळीत, शहरातून खासगी बस, ट्रक, हलकी वाहने वाढली जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहने वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदणी चौक : वाहतूक सुरळीत, शहरातून खासगी बस, ट्रक, हलकी वाहने वाढली
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहने वाढली
चांदणी चौक : वाहतूक सुरळीत, शहरातून खासगी बस, ट्रक, हलकी वाहने वाढली जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहने वाढली

चांदणी चौक : वाहतूक सुरळीत, शहरातून खासगी बस, ट्रक, हलकी वाहने वाढली जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहने वाढली

sakal_logo
By

पुणे/पिंपरी, ता. १ : मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या पाडकामामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक उर्से टोल नाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांचा ‘फ्लो’ वाढला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नियोजन केले असल्याने या मार्गाने पुण्याकडे जाणारी वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे. दरम्यान, सातारा, सोलापूरहून येणारी वाहतूक शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्गे मुंबई दिशेने जात आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील वाहनांची संख्या सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात वाढली.

सोलापूर, साताऱ्याहून मुंबईला जाणारी वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातून जाऊ लागली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता पासून कात्रज, स्वारगेट, बाजीराव रस्ता, शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच सोलापूर रस्त्यावरून येणारी वाहतूक शिवाजीनगर, गणेशखिंड, औंध, वाकडमार्गे मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली. बहुतांश वाहनांमध्ये खासगी बस, एसटी, ट्रक, तरकारी ट्रक, टेम्पो, पेट्रोल, डिझेल, दुधाचे टँकर, भाजीपाला, ट्रक अशा वाहनांचा सर्वाधिक समावेश होता. त्याचबरोबर कार, मिनी बस व अन्य हलक्या वाहनांची संख्या ही लक्षणीय होती.

• जुन्या महामार्गावर वाहने वाढली
दरम्यान, जड वाहनांना उर्से टोल नाक्यापासून बंद करण्यात आल्याने या मार्गाने येणारी इतर वाहने उर्से टोल नाका येथून सेंट्रल चौकमार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, यामार्गे पुढे जात आहेत. तसेच किवळे चौकातून रावेत, डांगे चौकमार्गे, रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरून औंध, शिवाजीनगरमार्गे वाहने इच्छितस्थळी जात आहेत. वाकड चौकातून डावीकडे वळूनही वाहने डांगे चौक मार्गे पुढे जात आहेत. दरम्यान, वाहनचालकांना पूर्वकल्पना असल्याने तसेच पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून योग्य नियोजन केल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गासह औंध-रावेत मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.

• राधा चौक ते बावधन वाहतूक सुरळीत
बावधनपासून कोंडीला सुरुवात
चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्याने मुंबई बेंगळुरू महामार्गावर कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक वाकड, राधा चौक ते सुतारवाडी पर्यंत सुरळीत सुरू होती. परंतु पुढे बावधन पुलापासून कोंडीला सुरुवात झाली. एकाचवेळी अनेक वाहने एकत्र आल्याने बावधन ते चांदणी चौकापर्यंत वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली.

• रात्री १० पर्यंत चांदणी चौकात वाहतूक कमी
चांदणी चौक येथे १० वाजेपर्यंत वाहतूक सुरू असली, तरी त्यानंतर रस्त्यावर वाहनांची संख्या झाली. त्यानंतर पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड लावून परिसर निर्मनुष्य करण्याची तयारी सुरू केली.