पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री मुंबईत घेणार बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री मुंबईत घेणार बैठक
पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री मुंबईत घेणार बैठक

पुण्याच्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री मुंबईत घेणार बैठक

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : पुण्यातील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेले असताना याबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेणार आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. या बैठकीत २३ गावांच्या पायाभूत सुविधा, पीएमपीएल, पाणीपुरवठा यासह इतर प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लोहगाव विमानतळावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख अजय भोसले, युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुण्यातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
पुण्यातील सर्वच भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोथरूड, चांदणी चौक, गणेशखिंड रस्ता, नगर रस्ता, हडपसर, कात्रज कोंढवा रस्ता यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मेट्रोचे व उड्डाणपुलाचे काम, अतिक्रमण, चुकीच्या पद्धतीने होणारे पार्किंग यामुळे कोंडीत भर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दरम्यान, पुणेकरांवर लादण्यात आलेली मिळकतकराची वाढ आणि ४० टक्के सवलतीच्या वसुलीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर यावेळी घालण्यात आला.