आंनदोत्सवात कोजागरी पौर्णिमा साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंनदोत्सवात कोजागरी पौर्णिमा साजरी
आंनदोत्सवात कोजागरी पौर्णिमा साजरी

आंनदोत्सवात कोजागरी पौर्णिमा साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : घर, सोसायटी, अपार्टमेंटच्या छतावर, कुठे एखाद्या छोट्या बागेत, मोकळे मैदान नागरिकांची आज प्रचंड गर्दी जमली होती. कुटुंब, मित्र मंडळी समवेत गाण्यांच्या रंगलेल्या मैफली आणि रात्री कोजागरी पौर्णिमेच्या चंद्राची शीतल छाया पातेल्यातील वाफळणाऱ्या दुधात पडल्यानंतर ग्लासभर दुधाचा आस्वाद घेत नागरिकांनी कोजागरीचा मनसोक्तपणे आनंद लुटला. कुठे हलक्या पावसाच्या रिमझिम सरी, तर कुठे थंड हवेची झुळूक अंगावर झेलत, गप्पा अन् गाण्यांची मैफल यानिमित्ताने उत्तरोत्तर रंगत गेली.

सलग दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे सर्व सण समारंभ साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यंदा मात्र सणांवर कुठलेही निर्बंध नसल्याने दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दसऱ्या पाठोपाठ आलेली कोजागरीही मोठ्या उत्साहात साजरी झाली. अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे समूह वसतिगृह, हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी एकत्र जमून कोजागरीचा आनंद घेतला. तर अनेक नागरिकांनी कुटुंबासह घर, अपार्टमेंटच्या छतावर एकत्र जमत मसाला दुधाचा आस्वाद घेतला. या वेळी त्यांच्या गप्पा आणि गाण्यांच्या मैफली रंगल्या होत्या.काहींनी एकत्र जमत खास रुचकर मेजवानीवर ताव मारला.

संध्याकाळच्या सुमारास जाणविणारा आल्हादायक गारवा, काही ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाच्या रिमझिम सरी अन्‌ त्यात कोजागरीनिमित्त रूचकर पदार्थांचा आस्वाद घेत गप्पा-गोष्टी करत नागरिकांनी हा दिवस साजरा केला. रात्री नागरिकांनी सामूहिकरित्या एकत्र येत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात कोजागरी पौर्णिमा साजरी करीत जुन्या आठवणीना उजाळा दिला.

पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त
कोजागरी सणाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून तपासणी केली जात होती. तर सार्वजनिक ठिकाणीही पोलिसांकडून रात्रगस्त घालत लक्ष ठेवण्यात येत होती.