‘दिवाळी पहाट’चे बदलते स्वरूप... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दिवाळी पहाट’चे
बदलते स्वरूप...
‘दिवाळी पहाट’चे बदलते स्वरूप...

‘दिवाळी पहाट’चे बदलते स्वरूप...

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : सुमारे दशकभरात रूढ झालेल्या खास ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे स्वरूप बदलत असून यात अलीकडे रागसंगीताच्या बैठकींना विशेष स्थान मिळत नाही, असे निरीक्षण प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी बोलताना नोंदवले आहे. याउलट, ‘असे कार्यक्रम सर्वसमावेशक ठेवणे हा आयोजकांचा उद्देश योग्यच असून जास्तीत जास्त संख्येने रसिकांना विविध संगीत प्रकारांचा आस्वाद घेण्यासाठी ती योजना असते, असे मत विख्यात गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले आहे.
कोपरकर म्हणाले, ‘‘शास्त्रीय संगीताच्या बैठकीत भटियार, ललत, भैरव यांसारखे राग गायची कलाकारांना व ते ऐकायची संधी श्रोत्यांना सहसा मिळत नाही. दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या निमित्ताने तो अनुभव घेता यायचा. पूर्वार्धात ख्यालगायन व उत्तरार्धात उपशास्त्रीय तसंच सुगम संगीत असे एकंदरीत स्वरूप असलेले कार्यक्रम वेगळीच अनुभूती देऊन जात. अलीकडच्या वर्षांमध्ये यात बदल होत असून सुगम गीत, नृत्य, गप्पा आदींचा एकत्रित समावेश असतो. त्यात निवडणुका जवळ आल्याने कित्येक कार्यक्रम राजकीय व्यक्तींच्या आर्थिक पाठबळावर आयोजित केले जात आहेत. त्यांचा भर अभिजात कलेपेक्षा अधिकाधिक लोकांपर्यंत करमणूकप्रधान कार्यक्रम पोचवण्याचा आहे.’’
अंकलीकर यांनी सांगितले की, मुळात दिवाळी पहाट ही संकल्पनाच जेमतेम दहा वर्षांपासूनची म्हणजे तुलनेने नवीच. या तऱ्हेच्या कार्यक्रमांची भव्यता, प्रसिद्धी व खर्चही मोठा असतो. यावेळी जमणाऱ्या बहुसंख्य श्रोत्यांना शास्त्रीय संगीताची जाण असेलच, असे नाही. ते ऐकण्यासाठी लागणारा निवांतपणाही दिवाळीच्या धामधुमीत नसतो. केवळ रागसंगीताच्या बैठकींचे आयोजन, त्यासाठीच वाहिलेल्या संस्थांनी करावे. अशा संस्था व खास त्या कार्यक्रमांसाठी जमणारे श्रोते, यांचा उद्देश समान असतो. परंतु दिवाळी पहाटसाठी वेगवेगळी आवडनिवड असणारे श्रोते एकत्र जमतात. त्यांना विविध कलागुणांचा आस्वाद घेता यावा, या हेतूने निरनिराळ्या सांस्कृतिक संस्था संमिश्र स्वरूपाचे कार्यक्रम करतात.