परिचारिका प्रशिक्षणासाठी ‘आयएमए’चा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिका प्रशिक्षणासाठी
‘आयएमए’चा पुढाकार
परिचारिका प्रशिक्षणासाठी ‘आयएमए’चा पुढाकार

परिचारिका प्रशिक्षणासाठी ‘आयएमए’चा पुढाकार

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : रुग्णालयातील खाटांच्या प्रमाणात नोंदणीकृत परिचारिका उपलब्ध होत नाहीत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी रुग्णालयातील कार्यरत अपात्र परिचारिकांना प्रशिक्षित करण्याची जबाबदार ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) घेतली आहे.
राज्याच्या नर्सिंग काउंसिलकडे नोंदणीकृत परिचारिकाच रुग्णालयात रुग्णसेवेसाठी असली पाहिजे. त्याची नोंद महापालिकेकडे केली पाहिजे. तरच, रुग्णालयाच्या नोंदणीचे नूतनीकरण होईल, असा कायदा राज्य सरकारने यापूर्वी केला आहे. मात्र, रुग्णालयातील खाटांच्या प्रमाणात नोंदणीकृत परिचारिका उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ‘आयएमए’च्या शिष्ठमंडळाने राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यातून हा पर्याय पुढे आला आहे.
महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, सचिव डॉ. मंगेश पाटे, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, ‘आयएमए’च्या पुणे शाखेचे खजिनदार डॉ. सुनील इंगळे आणि डॉ. नितीन भगली यात उपस्थित होते.
या बद्दल माहिती देताना डॉ. भगली म्हणाले, ‘‘राज्यात १६२ परिचर्या महाविद्यालये आहेत. त्यापैकी मोजकीच सरकारी आहेत. उर्वरित सर्व खासगी आहेत. त्यातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या परिचारिका पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. ‘बी.एससी.’ नर्सिंग झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात नोकरीसाठी त्या प्राधान्य देतात. किंवा परदेशात मोठ्या वेतनावरील नोकरी स्वीकारतात. खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवेला त्या प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील खाटांच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी असते. अशा वेळी रुग्णालयाच्या नोंदणी नूतनीकरणात अडथळा येतो. ही समस्या दूर करण्यासाठी रुग्णालयात वैद्यकीय सेवेतील महिलांना परिचारिकांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करता येईल. त्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करता येईल. या अभ्यासक्रमाला शिक्षण संस्थांची मान्यता घेता येईल. त्यातून प्रशिक्षित परिचारिका खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेत उपलब्ध होऊ शकेल. असा प्रस्ताव डॉ. सावंत यांच्यासमोर मांडला. त्यांनी त्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे.’’
डॉ. पाटील म्हणाले, “सरकारी रुग्णालयातही परिचारिकांच्या ४० टक्के जागा रिक्त आहेत. कोरोना उद्रेकात राज्यातील परिचारिकांचा मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती भरण्यासाठी केरळवरून परिचारिका रुग्णसेवेसाठी राज्यात आल्या होत्या. प्रशिक्षित परिचारिका आणि त्यांची मागणी यात तफावत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत परिचारिकांना प्रशिक्षण दिल्यास यापैकी काही भाग भरून निघेल.’’