शहरात ७५ ठिकाणी रस्ते धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात ७५ ठिकाणी रस्ते धोकादायक
शहरात ७५ ठिकाणी रस्ते धोकादायक

शहरात ७५ ठिकाणी रस्ते धोकादायक

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : शहरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर पहिल्यांदा वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जाते. मात्र वाहतूक कोंडी ही केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच नव्हे, तर खराब रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांमुळे होते. त्यामुळे शहरातील ७५ ठिकाणचे खराब रस्ते व खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, अशा मागणीचे पत्र पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
मागील एक ते दोन महिन्यापासून शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच वाहतूक पोलिसांचा रस्त्यावरील अभाव आणि वाहतूक नियमन करण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्याकडे दिला जाणारा भर यामुळे वाहतूक पोलिसांना नागरिकांसह विविध विभागांकडून ही टीकेचे धनी केले जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने पोलिसांना काही ठिकाणी वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. मात्र खड्डे दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यात शहराच्या वेगवेगळ्या भागांतील खराब रस्ते व मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या ७५ ठिकाणांची नावे देण्यात आली आहेत. संबंधित रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. रस्ते दुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यासह गंभीर स्वरूपाचे अपघातही कमी होतील, असे संबधित पत्रात नमूद केले आहे. कोरेगाव पार्क, लोणीकंद, लष्कर, वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा, लोणी काळभोर आदी विभागांतील रस्त्यांवर खड्डे आहेत, तर अनेक रस्ते खराब आहेत.

काही ठिकाणचे बहुतांश रस्ते खराब आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे आहेत. खड्डे दुरुस्तीबाबत पोलिस आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये ७५ ठिकाणचा समावेश आहे.
- अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा नियोजन

कोथरूड विभाग
- वेदभवन चौक ते कोथरूड डेपो चौक
- नळस्टॉप चौक ते पौड फाटा चौक
- आठवले चौक ते नळस्टॉप चौक

डेक्कन विभाग
- गरवारे पूल ते खंडूजीबाबा चौक
- स्वातंत्र्य चौक ते रसशाळा
- लकडी पूल

चतु:शृंगी विभाग
- बालेवाडी चौक ते पॅन कार्ड
- राजवाडा हॉटेल ते बाणेर फाटा
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक ते एस. बी. जंक्शन

शिवाजीनगर
- सुभाषचंद्र बोस चौक (संचेती रुग्णालय) ते शिवाजीनगर
- वीर चाफेकर चौक ते शिवाजीनगर

खडकी
- किर्लोस्कर कंपनी ते गुरुद्वारा
- पाचवड चौक ते आरगडे कॉर्नर
- सीएफडी डेपो ते फॅक्टरी हॉस्पिटल

येरवडा विभाग
- गुंजन चौक ते गोल्फ क्लब चौक
- पूर्णकुटी चौक ते गुंजन चौक
- सादलबाबा चौक

बंडगार्डन विभाग
- आरटीओ चौक ते शाहीर अमर शेख चौक
- शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का स्टेशन
- बोलाई चौक ते साधू वासवानी चौक
- पुणे स्टेशन ते अलंकार चौक
- आयबी चौक ते सर्किट हाउस चौक

भारती विद्यापीठ विभाग
- कात्रज चौक ते जुना बोगदा
- कात्रज चौक ते नवले पूल
- कात्रज चौक ते गोकुळनगर बस्थांबा (कात्रज कोंढवा रस्ता)
- पद्मावती चौक

सहकार नगर विभाग
- महेश सोसायटी चौक ते पासलकर चौक
- स्वामी विवेकानंद रस्ता

स्वारगेट विभाग
- जेधे चौक ते गोळीबार मैदान चौक
- सेवन लव्हज चौक ते आईमाता मंदिर

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता )
- भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक

वारजे विभाग
- वारजे ते एनडीए रस्ता
- ढोणे रस्ता
- उत्तमनगर रस्ता

PNE22T01519