महायुद्धातील वस्तू, पोषाख पाहण्याची पुणेकरांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महायुद्धातील वस्तू, पोषाख 
पाहण्याची पुणेकरांना संधी
महायुद्धातील वस्तू, पोषाख पाहण्याची पुणेकरांना संधी

महायुद्धातील वस्तू, पोषाख पाहण्याची पुणेकरांना संधी

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः महायुद्धात सैनिकांनी वापरलेल्या दुर्बिणी, त्यांचे मेडल्स, टोप्या आणि पोषाख तसेच एक मिली ग्रॅमच्या सोन्याच्या गणपतीची रूपे अशा वैविध्यपूर्ण वस्तूंचा खजिना पुणेकरांसाठी आज खुला झाला आहे. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमसतर्फे बालगंधर्व कलादालनात आयोजित दुर्मिळ वस्तूंच्या प्रदर्शनाचे शुक्रवारी चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात पुण्यासह राज्याच्या अन्य भागातील विविध संग्रहकांनी त्यांच्याकडील दुर्मिळ वस्तूंचा खजिना मांडला आहे. यामध्ये बॉटल ओपनर, लाकूड, धातूंपासून बनविलेल्या आजोबांच्या काठ्या, शंख शिंपले, माणूस चंद्रावर उतरला, भारताने जिंकलेला क्रिकेट विश्वचषक अशा महत्त्वपूर्ण घटनांची साक्ष देणारी ५० ते १०० वर्षांपूर्वीची जुनी वृत्तपत्रे, दिग्गजांच्या स्वाक्षरीवरून मधुसुदन घाणेकर यांनी केलेला त्यांच्या स्वभाव विश्लेषणाचा संग्रह, तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिवंगत नामवंतांच्या स्वाक्षऱ्यांचा गजानन पटवर्धन यांनी केलेला संग्रह, चहा-कॉफीचे मग अशा वैविध्यपूर्ण दुर्मिळ वस्तूंचा खजिना रसिकांसाठी खुला झाला आहे. बालगंधर्व कलादालनात आयोजित हे प्रदर्शन रविवार (ता. ३०) दहा ते सायंकाळी सात या वेळेत रसिकांसाठी खुले राहणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी अभिनेत्री, कवयित्री आणि निर्मात्या भाग्यश्री देसाई, प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक शशिकांत ढोणे, श्याम मोटे, सचिव शरद बोरा, खजिनदार नितीन मेहता आदी उपस्थित होते.