बार्गेनिंगचा पॉवर बायकोने केला कहर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार्गेनिंगचा पॉवर
बायकोने केला कहर...
बार्गेनिंगचा पॉवर बायकोने केला कहर...

बार्गेनिंगचा पॉवर बायकोने केला कहर...

sakal_logo
By

‘‘पोलिसदादा, पाचशे रुपये फार जास्त होतात. शंभर रुपयांमध्ये जमवून द्या. पलीकडच्या चौकातील पोलिसदादा तर पन्नास रुपयांमध्येही जमवून घेतात. नेहमीच्या ग्राहकाला काही विशेष डिस्काउंट आहे की नाही?’’ प्रमिलाने आज सकाळी वाहतूक पोलिसालाच घोळात घेतले होते. साडीच्या दुकानात बार्गेनिंग करतोय, असं समजून ती पोलिसाशी वागत होती. सिग्नल तोडला म्हणून हवालदारसाहेबांनी तिला थांबवले होते व पाचशे रुपये दंड भरायला सांगितला होता. मात्र, समोरच्याने पैशांचा आकडा सांगितला की तिच्यातील बार्गेनिंग पॉवर जागी व्हायची. त्यामुळे तिचा नवरा श्रीधरही तिच्याबरोबर यायला टाळाटाळ करायचा.
‘‘ताई, तुम्ही काय मंडईत आहात का? की कपडे खरेदी करायला आला आहात?’’ वैतागून हवालदारसाहेबांनी म्हटले पण प्रमिला शंभर-दीडशेच्या पुढे जात नव्हती. शेवटी हवालदारसाहेबांनी ‘येथे भेटलात, वर नका भेटू’ असे म्हणून दोन्ही हात जोडून जायला सांगितले. या खुशीतच ती ऑफिसला दांडी मारुन घरी आली. ‘‘अहो तुम्ही मला सारखं बार्गेनिंग करत जाऊ नकोस, असं सांगत होतात. आज त्याच्यामुळेच माझे पाचशे रुपये वाचले. आहे की नाही मी हुशार?’’ असे म्हणून तिने सगळा वृत्तांत श्रीधरला सांगितला. त्यावर तो काहीसा चिडला.
‘‘अगं बार्गेनिंग कोठं करावं, कोणाबरोबर करावं, किती करावं, याबाबत काहीतरी तारतम्य बाळगत जा. काल तू पेट्रोलपंपावर बार्गेनिंग करायला चालली होतीस. मी तुला अडवलं म्हणून पुढचा प्रसंग टळला. मिठाईच्या दुकानात जाऊन, सहाशे रुपयांची काजूबर्फी दोनशे रुपयांत मागत होतीस. गेल्यावर्षी सोन्या-चांदीच्या दुकानात जाऊन दागिने निम्म्या किमतीत मागत होतीस. मी पुढे झालो नाहीतर आपल्या दोघांनाही धक्के मारुन बाहेर काढले असते. अगं तेथील रेट फिक्स असतात, एवढं तरी माहिती पाहिजे. बरं इतर ठिकाणी बार्गेनिंग करावं पण एकदम दर पाडून मागतेस ते काही चांगलं नाही. लोकं हसतात तुला.’’ श्रीधरने तिला चांगलेच सुनावले. त्यावर प्रमिलाने माघार घेतली. ‘‘ठीक आहे. येथून पुढे मी फारशी घासाघीस करणार नाही.’’ तिने म्हटले. ‘‘अगं बार्गेनिंग करावं. पण एकदा-दोनदा आपला भाव सांगावा आणि लगेच व्यवहार करून टाकावा. तास न तास तो विषय घोळवत ठेवून स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नये.’’ श्रीधरने म्हटले. प्रमिलाही ते पटले. थोड्यावेळाने रस्त्यावरून ‘‘भंऽऽगार, रऽऽ द्दी’’ असा आवाज तिने ऐकला व घरातील रद्दी व भंगार सामान घेऊन ती खाली आली. भंगारवाल्याने सगळ्यांचे वजन केले व तीनशे रुपये सांगितले. ‘‘देखो भय्या, इसमे हमे कुछ परवडता नही. जरा ठीकठाक से लगाव. हम नेहमी के कस्टमर है’’ प्रमिलाने म्हटले.
‘‘बहनजी, बराबर रेट लगाया है, तीनशे रुपयेही होते है’’ भय्याने म्हटले. ‘‘देखो भय्या, हमे फसवणे का नही. आज से हम जादा वेळ बार्गेनिंग नही करेंगे. लेकिन तीनशे रुपये जादा होते है! शंभर रुपये मे सौदा फिट कर दो.’’ प्रमिलाने असं म्हटल्यावर भय्याला धक्काच बसला. त्याने तातडीने शंभर रुपये प्रमिलाच्या हातात टेकवले. एक-दोन मिनिटांत बार्गेनिंग संपल्याने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. घरी आल्यानंतर तिने श्रीधरला झालेला प्रकार सांगितला.
‘‘तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन मिनिटांत बार्गेनिंग आटोपले. आहे की नाही मी हुशार?’’ प्रमिलाने असं म्हटल्यावर श्रीधरने डोक्यावर हात मारुन घेतला.