थंडी वाढताच पुण्याची हवेची गुणवत्ता ढासळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

air quality in pune
थंडी वाढताच पुण्याची हवेची गुणवत्ता ढासळली

थंडी वाढताच पुण्याची हवेची गुणवत्ता ढासळली

पुणे - दिवाळीनंतर थंडी वाढल्याने शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे निरीक्षण ‘सफर’तर्फे बुधवारी नोंदविण्यात आले. विशेषतः कोथरूड, शिवाजीनगर आणि हडपसर येथील हवा सर्वाधिक खराब असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.

‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था’मधील (आयआयटीएम) ‘सफर’ने (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँण्ड वेदर फोर्कास्टिंग अँण्ड रिसर्च) हे निरीक्षण नोंदविले आहे. पुण्यासह दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमधील विविध भागातील हवेची गुणवत्तेवर ‘सफर’ सातत्याने मोजते. त्यातून सध्या पुण्याच्या हवेची गुणवत्ता ढासळल्याचे माहिती पुढे आली. पुण्यातील शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज, पाषाण, हडपसर, लोहगाव, आळंदी, भोसरी, भूमकर चौक, निगडी अशा ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजण्यात येते.

कशामुळे होते हवा दूषित?

१. हवेतील सूक्ष्म (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण जितके जास्त तितकी हवेची गुणवत्ता कमी असते. साधारणतः रस्त्याच्या कडेला असलेली धूळ वाहनांमुळे सतत हवेत फिरत राहाते. तसेच, बांधकाम, विकास कामे यातून धुळीचे प्रमाण हवेत वाढते. याचा परिणाम हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढते.

२. नायट्रोजनडाय ऑक्साइड (एनओ२) आणि कार्बन मोनॉक्साईड (सीओ) या स्वयंचलित वाहनांच्या धूरातून हवेत मिसळणाऱ्या प्रदूषकांमुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे.

हिवाळ्यात का होते हवा खराब?

हिवाळ्यात हवेचे अभिसरण कमी होत असल्याने जड असलेली दूषित हवा जमिनीच्या जवळ स्थिर राहाते. त्यातून हिवाळ्यात हवेची गुणवत्ता ढासळते. उन्हाळ्यात जमीन तापते. त्या बरोबरच जमिनीच्या जवळची हवा तापून वर जाते आणि जड हवा पुन्हा जमिनीजवळ येते. हे अभिसरण उन्हाळ्यात होत नाही. पुण्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून हवेतील थंडी वाढल्याने अभिसरणाची प्रक्रिया थांबली आहे. त्यातून हवेची गुणवत्ता ढासळली, अशी माहिती पर्यावरण अभ्यासकांनी दिली.

काय करा?

- दमछाक होईल अशी कामे कमी करा

- खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या

- तंदुरुस्त असलेल्या नागरिकांनी नियमित व्यायाम करावा.

भाग ............ हवेची गुणवत्ता

शिवाजीनगर ...... वाईट

कोथरूड ............. वाईट

हडपसर .............. वाईट

लोहगाव .............. बरी

भूमकर चौक ......... बरी

भोसरी ................. बरी

आळंदी .............. बरी

कात्रज ............... चांगली

निगडी .............. चांगली

पाषाण ..............चांगली

टॅग्स :puneWeatherCold