दुकानाच्या परवाना रद्दला साठ दिवसांनंतर स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकानाच्या परवाना रद्दला
साठ दिवसांनंतर स्थगिती
दुकानाच्या परवाना रद्दला साठ दिवसांनंतर स्थगिती

दुकानाच्या परवाना रद्दला साठ दिवसांनंतर स्थगिती

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : परवाना रद्द केलेल्या औषध दुकानाला तब्बल साठ दिवसांनंतर स्थगिती आदेश मिळाला. त्यामुळे दोन महिने बंद असलेले औषध दुकान गुरुवारी उघडले.
औषध दुकानाच्या तपासणीनंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील एका दुकानाचा परवाना निलंबित केला. त्याला स्थगिती आदेश घेण्यासाठी फार्मासिस्टने राज्य सरकारकडे धाव घेतली. पण, दोन महिने त्याच्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे तब्बल ६० दिवस दुकान बंद ठेवावे लागले, अशी माहिती औषध विक्रेत्यांनी दिली.
औषध दुकानांवरील कारवाईला स्थगिती देण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी धुळखात पडले आहेत. त्यावर कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने औषध विक्रेत्यांना आणि पर्यायाने नागरिकांना फटका बसत आहे. स्थगितीवर निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा औषध विक्रेत्यांच्या संघटनेने यापूर्वी दिला आहे. ‘एफडीए’ कारवाई केल्यानंतर त्याबाबत सरकारकडे दाद मागण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना कायद्याने दिला आहे. या बाबत अन्न व औषध प्रशासनाच्या मंत्र्यांकडे सुनावणी होते. त्यानंतर औषध दुकानांवरील स्थगिती आदेशाबद्दल अंतिम आदेश दिला जातो. गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडे तीनशे ते चारशे स्थगिती आदेशाचे प्रस्ताव आहेत. त्याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे या औषध दुकानांचे भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असेही औषध विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे सांगण्यात आले.
केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘सरकारची कोणतीही परवानाही नसताना ऑनलाइन औषध विक्री राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे औषध दुकानदारांचे कंबरडे मोडत आहे. त्याकडे ‘एफडीए’ लक्ष देत नाही. औषध दुकानांवर कारवाई केल्यावरही त्याला सरकारकडून लवकर स्थगिती आदेश मिळत नाही. याचा फटका औषध विक्रेत्यांना बसत आहे.’’