जुन्या आवडी-निवडी वर आल्या भानगडी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या आवडी-निवडी
वर आल्या भानगडी!
जुन्या आवडी-निवडी वर आल्या भानगडी!

जुन्या आवडी-निवडी वर आल्या भानगडी!

sakal_logo
By

आयुष्यात इथून पुढे बायकोसोबत असताना कोणत्याही अनोळख्या सुंदर तरुणीशी मी बोलणार नाही. नाही म्हणजे नाही, अशी मी प्रतिज्ञा केली आहे. समजा तिने बोलायचा प्रयत्न केला तरी मी हात जोडून तिला म्हणेन, ‘‘बाई गं, मी जन्मापासून मुका आहे. त्यामुळे मला अजिबात बोलता येत नाही.’’ तरीही तिने बोलायचा हट्टच धरला तर हळूच तिला मोबाईल नंबर देईल व सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यालयीन वेळेतच फोन कर. रविवारी वा सुटीच्या दिवशी मी घरी बायकोसोबत असतो. त्यावेळी अजिबात नको, असं तिला बजावेल.
परस्त्रीशी न बोलण्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला आहे की मी वाट्टेल त्या थापा मारू लागलो आहे. आज सकाळी मी बायकोसोबत मंडईत भाजी खरेदी करत होतो. त्यावेळी एका तरुणीने ‘आज किती तारीख आहे हो?’ असं सहज विचारलं. त्यावेळी मी घाबरुन ‘मला माहिती नाही, मी पुण्यात नवीन आहे,’ असं उत्तर दिलं. आता तुम्ही म्हणाल ‘एवढं काय झालं?’ तर ती करुण कहाणी तुम्हाला सांगितलीच पाहिजे.
गेल्या आठवड्यात बायकोच्या नात्यातील लग्नाला आम्ही दोघे गेलो होतो. लग्न लागल्यानंतर मी जेवणाच्या पंगतीत बसलो. माझ्या शेजारी एक सुंदर तरुणी बसली होती. बराचवेळ झाला तरी वाढपी वाढायला येत नव्हते. त्यामुळे नुसतं बसून काय करायचं म्हणून मी तरुणीशी गप्पा माराव्यात असं ठरवलं. ‘‘काय लग्नाला आला वाटतं?’’ मी सहज विचारलं. त्यावर ‘‘नाही हो. जेवायला आलेय. आमच्या घरचे सगळे गावाला गेलेत. स्वयंपाक कोण करणार? म्हणून म्हटलं चला कोठेतरी जेवायला जाऊ. म्हणून आले.’’ त्या तरुणीने असं उत्तर दिल्यावर माझी बोलतीच बंद झाली. तरीही मी हार मानली नाही. पण प्रत्येक प्रश्नाला ती तिरक्यातच जात होती. शेवटी ‘‘कोठल्या कॅालेजला जाता।’’ हे ठेवणीतील अस्त्र काढल्यावर तिची कळी खुलली.
‘‘अहो, कॉलेज सोडून सात-आठ वर्षे झाली. मी फर्ग्युसनला होते.’’ असं तिने म्हटल्यावर माझा चेहरा फुलला. ‘‘कोठली बॅच’’ असं विचारल्यावर ती माझ्या मागे दोन वर्षे होती, हे मला समजलं. त्यावेळी आमची ओळख नव्हती. तेवढ्यात वाढपी येऊन वाढू लागले. मला जिलेबी व लाडू अजिबात आवडत नसल्याचे एव्हाना तिच्या लक्षात आले. त्यामुळे हे पदार्थ घेऊन येणाऱ्यांना ‘यांना गोड अजिबात आवडत नाही. मसालेभात आणा’ असे सांगू लागले. आता आमच्या गप्पा चांगल्याच रंगू लागल्या होत्या. एक पंगत उठून दुसरी बसली तरी आमचे जेवण चालूच होते. जेवण कमी आणि गप्पाच जास्त, असे त्याचे स्वरुप होते. कसं काय कोणास ठाऊक, माझ्या बायकोपर्यंत ही बातमी गेली. मोकळ्या हातानं कसं यायचं म्हणून ती लाडूची बादली घेऊन आमच्या पंगतीत आली. ‘‘लाडू घ्या’’ माझ्याकडं बघून तिनं रागानं म्हटलं. ‘‘अहो ताई, यांना लाडू, जिलेबी असलं गोड काही आवडत नाही. तुम्ही मसालाभात आणा.’’ असं तरुणीने म्हटल्यावर बायको पाय आपटत गेली. नंतर तिने खरंच मसालाभाताची परात आणली. बायको वाढू लागली. त्यावर ती तरुणी म्हणाली, ‘‘कॉलेजमध्ये असल्यापासून यांना मसालाभाताची फार आवड. मला तर सारखे म्हणायचे, प्रिया तुझ्या मसालेभाताची सर कोणा कोणाला नाही. त्यामुळे मी डब्यातून रोज मसालेभात आणायचे पण आता खातात बायकोच्या हातचा शिळा भात. फोडणीचा भात म्हणून. हे ऐकून फार वाईट वाटलं. दुर्देव एखाद्याचे.’’ प्रियाची टकळी सुरुच होती. बायको मात्र दात-ओठ खात सगळं ऐकत होती. घरी आल्यानंतर तिने जमदग्नीचा अवतार धारण केला.
‘‘कोण होती ती बया. कॉलेजमधलं प्रेमप्रकरण अजून सुरु आहे का? तुमच्या आवडी-निवडी अजून तिच्या लक्षात कशा?’’ असं म्हणून तिने माझ्यावर लाटण्याने हल्ला चढवला. त्याचवेळी मी ‘बायको सोबत असताना परस्त्रीशी परत बोलायचं नाही’ असा कानाला खडा लावला आहे.