थंडीत वातावरण गरम अखेर ‘तो’ झाला नरम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडीत वातावरण गरम
अखेर ‘तो’ झाला नरम!
थंडीत वातावरण गरम अखेर ‘तो’ झाला नरम!

थंडीत वातावरण गरम अखेर ‘तो’ झाला नरम!

sakal_logo
By

‘‘हा काय प्रकार आहे? एवढी थंडी पडली असतानाही तुम्ही एवढी थंडगार आइस्क्रीम कशी काय दिलीत? माझ्या दातांना झिणझिण्या आल्या ना. माझ्या दातांना काय झालं तर त्याला जबाबदार कोण?’’ जनूभाऊंनी आइस्क्रीम विक्रेत्याला धारेवर धरलं.
‘‘आजोबा, आइस्क्रीम थंडगारच असणार ना. गरम असायला तो काय वडा-पाव आहे का? थंडगार आइसक्रिमवरुन तुम्ही गरम कशाला होताय?’’ विक्रेत्याने म्हटले. ‘‘ऐन हिवाळ्यात रात्रीच्या वेळी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने आइस्क्रीम मागितली तर थोडी गरम करुन दिली तर बिघडेल का? पण तुम्ही कशाला ग्राहकांच्या हिताचा विचार कराल? सगळीकडे नफेगिरी वाढलीय. तुमच्या या वृत्तीचा मी निषेध करतो. डोकं ठणकत होतं म्हणून आइस्क्रीम खाल्यानंतर ते कमी होईल, असं वाटलं पण कसलं काय? थंडगार आइस्क्रीम खाल्यानंतर डोकं ठणकायचं तर वाढलंच शिवाय दातांचा ठणकाही वाढला. याला जबाबदार कोण?’’ नूभाऊंनी तणतण करीत म्हटले.
‘‘आजोबा, दातांचा ठणका वाढला म्हणून तुम्ही उगीचंच आमच्या नावानं ठणाणा करताय. वास्तविक थंडीच्या दिवसात तुम्ही आइस्क्रीम खाण्याऐवजी गरमागरम चहा प्यायला हवा होता. समोरच्या कोपऱ्यात तर मिळतो.’’ विक्रेत्याने सल्ला दिला. ‘‘हे बघा, मी रात्रीच्यावेळी आइस्क्रीम खायची की चहा प्यायचा, हा माझ्या व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. त्यात तुम्ही लुडबूड केलेली मला आवडणार नाही. तुम्ही आता मला एवढी थंडगार आइस्क्रीम का दिलीत, याचे समर्पक उत्तर द्या. नाहीतर मी तुम्हाला ग्राहक न्यायालयात खेचेन.’’ जनूभाऊंनी इशारा दिला.
‘‘जाऊ द्या ना आजोबा. पुढच्यावेळी मी तुम्हाला उकळणारी आइस्क्रीम देईल. ती खाताना तुमचे तोंड भाजेल, इतकी ती गरम असेल.’’ विक्रेत्याने म्हटले. हे ऐकून जनूभाऊ खवळले, ‘‘माझे तोंड पोळेल, याचीच तुम्ही वाट बघताय वाटतं. आता माझ्या दातातून कळा येत आहेत. उद्या माझं तोंड कसे भाजेल, याची तजवीज करताय. मी काही खाऊ नये, मला जेवण जाऊ नये, याची तुम्ही किती काळजी घेताय. मी काय तुमच्या घरी रोज जेवायला येतो का?’’ जनूभाऊंनी आवाज चढवत म्हटले.
‘‘आजोबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला तसं काही म्हणायचं नव्हतं.’’ विक्रेत्याने समजुतीचा सूर लावला. ‘‘मग कसं म्हणायचं होतं. माझ्या दाताला काय झालं तर त्याला जबाबदार कोण?’’ जनूभाऊ मूळ मुद्यावर आले. ‘‘आजोबा, आपल्या दुकानाच्यावर दातांच्या डॉक्टरचा दवाखाना आहे. तिथे तुमच्यावर सवलतीत उपचार केले जातील.’’ विक्रेत्याने असं म्हटल्यावर जनूभाऊंचे पित्त उसळले. ‘‘तुमच्या दोघांचा डाव आता माझ्या लक्षात आला. तुम्ही ग्राहकांना मुद्दाम थंडगार आइस्क्रीम देता. त्यामुळे त्यांच्या दातातून कळा येतील. मग ते उपचारांसाठी दातांच्या दवाखान्यात जातील. त्यामुळे डॉक्टरांचा धंदा जोरात चालणार. तुम्हाला प्रत्येक पेशंटमागे भरपूर कमिशन मिळत असणार. तुमच्या दोघांचं चांगलं साटंलोटं चालू आहे. यात माझ्यासारख्या ग्राहकांचा मात्र बळी जातोय.’’ जनूभाऊंनी म्हटलं. दोघांचा वाद वाढत चालला. मात्र, कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. फुकटची करमणूक बघण्यासाठी नेहमीप्रमाणे बघ्यांची गर्दी झाली होती. बराचवेळ वाद चालल्याने विक्रेत्याचं डोकं गरम झालं. ते थंडगार होण्यासाठी त्याने आईसक्रिमची मोठी डिश खाण्यासाठी घेतली तर कोणाची तरी जिरवली हे पाहून जनूभाऊंचे डोकं आणि दात दोन्हींचा ठणका एकदम कमी झाला. खुशीतच शीळ घालत ते घराकडे निघाले.