प्रायोगिक नाटकांसाठी उभारणार नवे नाट्यगृह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रायोगिक नाटकांसाठी उभारणार नवे नाट्यगृह
प्रायोगिक नाटकांसाठी उभारणार नवे नाट्यगृह

प्रायोगिक नाटकांसाठी उभारणार नवे नाट्यगृह

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणासाठी पुण्यात एक हक्काचे, अद्ययावत आणि परिपूर्ण व्यासपीठ तयार व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे एका नवीन नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. या नाट्यगृहासाठी लागू कुटुंबियांनी साठ लाख रूपयांची मदत करत त्यातील मोठा वाटा उचलला आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या जन्मदिनी डॉ. आनंद लागू यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे राजेश देशमुख तसेच डॉ. श्रीराम लागू यांच्या कन्या डॉ. शुभांगी कानिटकर या वेळी उपस्थित होत्या.

देशमुख म्हणाले, ‘‘पुण्यात समीप नाट्याचा अनुभव देणारे काही नाट्यगृह उपलब्ध आहेत. तसेच प्रायोगिक नाटकांसाठी इतरही काही नाट्यगृहे आहेत. मात्र, एकाच ठिकाणी विविध प्रयोग करून पाहण्याची शक्यता उपलब्ध करून देणारे नाट्यगृह नव्हते. या विचारातून महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या नाट्यगृहाची कल्पना मांडली. अनेकविध रंगमंचीय शक्यता उपलब्ध करून देणारे, सर्व प्रकारच्या नेपथ्य रचनांसाठी पूरक आणि नृत्य, नाट्य, संगीत, सिनेमा, दृकश्राव्य कला अशा सर्वांना अवकाश देणारे हे नाट्यगृह असेल. सेंटरच्या विद्यमान इमारतीतच पहिल्या मजल्यावर हे सभागृह तयार होणार आहे. २५०-३०० आसन क्षमतेचे हे नाट्यगृह पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.’’

डॉ. आनंद लागू म्हणाले, ‘‘महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या नाट्यगृहाला डॉ. श्रीराम लागू यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला आम्ही आनंदाने होकार दिला. तसेच, कोरोना काळात क्षणभंगुरतेची जाणीव झाल्याने काहीतरी चिरस्थायी उभे राहावे, हा विचार मनात घोळत होताच. त्यातूनच या नाट्यगृहाला आर्थिक सहाय्य करायचे आम्ही ठरवले.’’

तन्वीर सन्मान स्थगित!
यंदापासून डॉ. लागू यांच्या जन्मदिनी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, तर तन्वीर सन्मान स्थगित करण्यात येत असल्याचेही डॉ. आनंद लागू यांनी सांगितले.