नवोदितांना मुक्त व्यासपीठ देणे आपली जबाबदारी ज्येष्ठ रंगकर्मी सुनील शानबाग; तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवोदितांना मुक्त व्यासपीठ देणे आपली जबाबदारी  
ज्येष्ठ रंगकर्मी सुनील शानबाग; तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान
नवोदितांना मुक्त व्यासपीठ देणे आपली जबाबदारी ज्येष्ठ रंगकर्मी सुनील शानबाग; तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान

नवोदितांना मुक्त व्यासपीठ देणे आपली जबाबदारी ज्येष्ठ रंगकर्मी सुनील शानबाग; तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : ‘‘आज अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अशा विविध पेशांचे शिक्षण घेतलेली मुले नाटकात काम करण्यासाठी येत आहेत. चांगल्या आणि स्थिर उत्पन्नाची खात्री असलेली क्षेत्रे सोडून ही मुले अस्थिर अशा नाट्यक्षेत्रात येत आहेत. त्यांना रंगभूमीची ओढ आहे, ही चांगली बाब आहे. मात्र त्यांच्या कल्पनांसाठी पूरक वातावरण उपलब्ध आहे का, त्यांच्या अभिव्यक्तीसाठी योग्य वातावरण निर्माण करणे, ही आपली म्हणजे संपूर्ण नाट्य समुदायाची जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनील शानबाग यांनी बुधवारी केले.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या १६ नोव्हेंबर या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांनी स्थापन केलेल्या रुपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ यंदा रंगकर्मी विद्यानिधी (प्रसाद) वनारसे यांना शानबाग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम, मुलगा डॉ. आनंद लागू, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, सेंटरचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते. या वेळी ‘रंगमंचाचा अवकाश-काल, आज, उद्या’ या विषयावर शानबाग यांनी विचार मांडले.

शानबाग म्हणाले, ‘‘कोरोना काळ हा रंगभूमी आणि कलावंतांसाठी आव्हानाचा आणि गंभीर काळ होता. या काळात काहींनी ऑनलाइन थिएटर हा पर्याय समोर आणला, मात्र त्यात नाटकाचा मूळ आत्मा नसल्याने तो फारसा रुचला नाही. तसेच, कोरोनापश्चात अनेक कलाकार स्थलांतरित झाले. त्यातील अनेक जण पुन्हा रंगमंचावर आलेच नाहीत. त्यामुळे नाट्यक्षेत्राला कलाकारांची उणीव भासू लागली. प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती करण्याचे आव्हान आता रंगभूमीसमोर आहे.’’

‘‘नाटक शिकवता येत नाही, पण ज्याची शिकण्याची इच्छा आहे, त्याला शिकता येईल असे वातावरण निर्माण करण्याचा मी कायम प्रयत्न केला,’’ असे वनारसे यांनी सांगितले. गौरी लागू यांनी सूत्रसंचालन केले.

कोरोनासारखे आव्हान पूर्वीही
कोरोनासारखे आव्हान रंगभूमीसमोर यापूर्वीही आले होते. देशात १८९६ प्लेगची साथ आली. मुंबईत काही वर्षे प्लेगचा प्रादुर्भाव कायम होता. त्यावेळीदेखील लॉकडाउन होता. चार वर्षांनंतर शहराचे जनजीवन सुरळीत झाले. त्यावेळी रंगभूमीसमोर चित्रपटांचे आव्हान आले होते. आता कोरोनानंतर रंगभूमीसमोर टेलिव्हिजनसह ‘ओटीटी’ नावाचा एक स्पर्धक उभा आहे, असे मत सुनील शानबाग यांनी व्यक्त केले.

फोटो - 08940