पत्रास कारण की मला आई-बाबा हवेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रास कारण की
मला आई-बाबा हवेत!
पत्रास कारण की मला आई-बाबा हवेत!

पत्रास कारण की मला आई-बाबा हवेत!

sakal_logo
By

प्रिय आई-बाबा,
सप्रेम नमस्कार!
मला शालेय जीवनात मिळालेल्या यशाचं सारं श्रेय तुम्हा दोघांचं आहे, यात शंका नाही. काही महिन्यांपूर्वी दहावीच्या परीक्षेत मला ९९ टक्के गुण मिळाले होते. आपल्या दोघांच्या सहकार्यामुळेच ते मी मिळवू शकलो, याची मला नम्र जाणीव आहे. तुम्ही दोघेही सतत फेसबुक व व्हॉट्सॲपवर असल्याने तुमच्यात अजिबात भांडणे होत नाहीत. त्यामुळे घरात शांतता नांदते. त्यामुळेच मी घरात निवांतपणे अभ्यास करू शकलो. मला दहावीत ९९ टक्के मिळाल्याची माहिती मी सांगितल्यावर बाबांनी तर मोबाईलमध्ये खुपसलेलं डोकं वरही न उचलता ‘हो का? छान’ एवढीच प्रतिक्रिया दिली व लगेचच फेसबुकवर ‘आमच्या पार्थला दहावीला ९९ टक्के मिळाल्याबद्दल अभिनंदन’ अशी पोस्ट टाकली व दिवसभर त्या पोस्टला किती लाईक व कमेंटस आल्यात, हे पाहू लागले. आईनेही तिच्या अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर दहावीच्या निकालाबद्दल पोस्ट टाकली व कोणी कोणी अभिनंदन केले आहे, हे तपासू लागली.
‘मनीषाने मुद्दाम अभिनंदन केले नाही. जळकी कोठली’ हे स्वतःशी बोललेलं वाक्यही मला स्पष्ट ऐकू आलं. पण मोबाईलच्या नादात माझं अभिनंदन करावं, हे तुमच्या दोघांनाही सुचलं नाही. वर्षातून दोनदा-तीनदा ‘कितवीत आहेस? पैशांची काही काळजी नाही ना?’ असा प्रश्न विचारला की आपली जबाबदारी संपते, असा बाबांचा समज असावा. त्यामुळे दरवर्षी ही जबाबदारी ते उत्तम पार पाडतात. फक्त कधीतरी मी समजून ते भलत्याच मुलाला हा प्रश्न विचारतात. एकदा मोबाईलच्या नादात त्यांनी शेजारच्या काकूंनाच हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी नस्ती आफत ओढवली होती. अनेक मुलांच्या घरी आई-बाबांची भांडणे होत असतात. त्यामुळे ती सतत तणावाखाली असतात. आपल्या घरी तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही तर भांडायला कधी मिळायचा. आपल्या घरात आपण तिघेही जेवतानाच काय ते तोंड उघडतो. इतरवेळी तुम्ही दोघे तोंडासमोर मोबाईल घेऊन बसता तर मी तोंड बारीक करुन एका कोपऱ्यात बसलेलो असतो.
‘J1’ झालं का? असं बाबा अनेकींना विचारतात, पण आपला मुलगा जेवला आहे का? याची त्यांनी कधी विचारपूस केली नाही. अर्थात आपल्या घरातील व्यक्तींची काळजी कोणीही घेतं पण अनोळख्या व्यक्तींना एवढ्या प्रेमानं कोण वागवतं? बाबांकडून हा गुण घेण्यासारखा आहे. ‘स्वयंपाक करतानाही आई मोबाईलमध्ये इतकी दंग झालेली असते, की चहामध्ये तिने अनेकदा साखरेऐवजी मीठ घातले आहे. तर भाजीमध्ये मिठाऐवजी साखर घातली आहे. मात्र, मोबाईलच्या नादात बाबांना बदललेली चवही कधी जाणवली नाही. फक्त एकदा मटणाच्या भाजीत आईने साखर टाकल्यावर ‘आज गोड मटण केलंय का? यूट्युबवर नवीन रेसिपी पाहिलेली दिसतेय. चव छान आहे’ एवढंच बाबा म्हणाले. आहे ते ‘गोड’ मानून घेण्याची सवय मोबाईल लावतो, हे त्यादिवशी मला कळले. तुमच्या मोबाईल वेडामुळे आपली आर्थिक बचत होऊ लागली आहे, हे खरं आहे. मी लहान असताना आपण बाहेरगावी फिरायला जायचो. ते आता तुम्ही बंद केले आहे. नाटक-सिनेमांना आपण तिघेही जायचो. मात्र, अलीकडच्या काळात ते सगळं बंद झालंय. पैशांची एवढी बचत मोबाईलमुळेच होऊ शकली. त्यामुळे त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. पूर्वी आपण तिघेही गप्पागोष्टी करायचो. वेगवेगळे विनोद करून हसायचो. आता तुम्ही दोघेही रील्स बघून एकटेच हसत बसता. तुमचं असलं हसणं बघून मला हसावं का रडावं, हेच कळत नाही.

ता. क. : आई-बाबा, मोबाईलमधून थोडा वेळ काढून आपल्याला एक मुलगा आहे, याची आठवण करून देण्यासाठी मी हे पत्र लिहिले आहे. कृपया नेहमीप्रमाणे पत्राची लिंक मागू नये, ही विनंती.
कळावे,
आपला मुलगा
पार्थ