मिसकॉल बायकोचे मनात विचार नको ते! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिसकॉल बायकोचे 
मनात विचार नको ते!
मिसकॉल बायकोचे मनात विचार नको ते!

मिसकॉल बायकोचे मनात विचार नको ते!

sakal_logo
By

‘‘तुझ्यासारखे छपन्न गुंड मी पाहिलेत. मी घाबरत नाही कोणाला. उगाचच आवाज चढवू नको.’’ एका गुंडाने गाडी घासल्यानंतर सुधीरने त्याला जाब विचारला. मात्र, मी कोण आहे, हे ओळखलं नाही का? असं म्हणून तो त्याच्यावर अरेरावी करू लागला. त्यावर मात्र सुधीरची सटकली. त्याने त्याला चांगलेच फैलावर घेतले. त्यावर मात्र गुंडाने माघार घेतली.
त्यानंतर सुधीर ऑफिसमध्ये आला. साहेबांनी केबिनमध्ये बोलावल्याचा निरोप शिपायाने दिल्यानंतर फाइल घेऊन तो गेला. ‘‘मि. धांदरफळे, काम करता की झोपा काढता. किती चुका केल्यात.’’ साहेबांनी सुधीरला आवाज चढवत विचारले. ‘‘काम करताना कधीतरी डोकं वापरत जा. आज तरी डोकं आणलंय की घरी विसरून आलाय?’’ साहेबांनी असं बोलल्यावर सुधीरचा रागाचा पारा चढला. ‘‘साहेब, ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नका. घरातला राग आमच्यावर काढू नका. परत ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवतो.’’ सुधीरने असं म्हटल्यावर साहेबांची बोलतीच बंद झाली. त्यानंतर फोन सायलेंट मोडवर ठेवून तो कामात गर्क झाला. सायंकाळी चार वाजता त्याने मोबाईल पाहिला. त्यावेळी प्राजक्ताचे पाच मिसकॉल पाहून त्याचे धाबे दणाणले. त्याने ताबडतोब प्राजक्ताला फोन केले. मात्र, तिने फोन न उचलल्याने सुधीरला घाम फुटला. ‘प्राजक्ताने एवढे पाच फोन कशासाठी केले असतील? या विचाराने तो अस्वस्थ झाला. काल आपण पिंटूच्या शाळेत पालकसभेला गेलो होतो. वर्गात पिंटू खूप बडबड करत असतो. कोणाशी भांडण झाल्यानंतर हातात येईल ते फेकून देतो. त्यानंतर माझ्याकडे तक्रार करताना नाटकी रडतो, अशी तक्रार त्याच्या शिक्षिकेने केली होती. त्यावेळी आपण ‘‘जाऊ द्या हो मॅडम, पिंटू त्याच्या आईवर गेला आहे,’’ असं आपण सहज म्हटलं होतं. त्या शिक्षिकेने तर काही प्राजक्ताला सांगितले नसेल ना? अशी शंका त्याला आली. तसं असेल तर गमतीने म्हटलं होतं, असा खुलासा करायचा. तरीही प्राजक्ताने ऐकलं नाही तर माफी मागायची, असंही त्यानं ठरवलं. आज सकाळी शेजारच्या मानसीवहिनींना ‘या साडीत तुम्ही सुंदर दिसता’ असं म्हटलं होतं. त्यांनी तर तक्रार केली नसेल ना? तसं असेल तर ‘मानसीवहिनीपेक्षा तू या साडीत सुंदर दिसशील. चल आजच आपण तशी साडी खरेदी करू या’ असं म्हणायचं, असं त्यानं ठरवलं. प्राजक्ताच्या भावाला आपण पंचवीस हजाराला गंडवलं होतं, ही बाब त्याच्या लक्षात आली नसेल ना? त्याने बहिणीकडे तक्रार केली नसेल ना? तसं असेल तर पंचवीस हजार रुपये आपण‍ लगेच देऊन टाकू व प्रकरण मिटवून टाकू, असं त्याने ठरवलं. आपण एका गुंडाला त्याची जागा दाखवली. बॉसलाही आपण उलटं बोललो. मात्र, बायकोचे मिसकॉल पाहून आपली पाचावर धारण बसल्याचे पाहून तो आणखी चिंतेत पडला.
नेहमीपेक्षा आज तो लवकर ऑफिसमधून बाहेर पडला. घरी गेल्यानंतर खाली मान घालून अपराधी मनाने तो म्हणाला, ‘‘प्राजू सॉरी! कामाच्या धबडग्यात मी तुझा फोन उचलू शकलो नाही. परत असं होणार नाही.’’ सुधीरने असं म्हटल्यावर प्राजक्ता खळाळून हसली.
‘‘अहो, मी एकदाही तुम्हाला फोन केला नाही. पिंटूच्या हातात माझा मोबाईल होता. खेळता खेळता त्यानेच चुकून तुम्हाला फोन लावलेत.’’ प्राजक्ताचं बोलणं ऐकून सुनीलचा चेहरा पुन्हा एकदा पडला.