माजी उपसचिव शिरीष मोहोळ यांची नोंदवण्यात आली साक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी उपसचिव शिरीष मोहोळ 
यांची नोंदवण्यात आली साक्ष
माजी उपसचिव शिरीष मोहोळ यांची नोंदवण्यात आली साक्ष

माजी उपसचिव शिरीष मोहोळ यांची नोंदवण्यात आली साक्ष

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याचे माजी उपसचिव शिरीष मोहोळ यांची साक्ष व उलटतपासणी नोंदविण्यात आली. या प्रकरणात आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्याच्या आदेशावर मोहोळ यांनी स्वाक्षरी केली होती.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वतीने (सीबीआय) विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी शिरीष मोहोळ यांची साक्ष नोंदवली. या प्रकरणातील आरोपींवर ‘यूएपीए’ अन्वये आरोप ठेवण्यासाठी ‘सीबीआय’ने तत्कालीन मुख्य सचिवांना पत्र दिले होते. या पत्रासोबत जोडलेले आरोपींचे जबाब अभ्यासून या संदर्भातील आदेशाला मान्यता दिल्याचे तत्कालीन उपसचिव मोहोळ यांनी न्यायालयात सांगितल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर आणि अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ डिसेंबर रोजी होणार आहे.