मुंबई आणि पुण्याच्या गिर्यारोहांकडून ''शेंडी'' सुळका सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई आणि पुण्याच्या गिर्यारोहांकडून ''शेंडी'' सुळका सर
मुंबई आणि पुण्याच्या गिर्यारोहांकडून ''शेंडी'' सुळका सर

मुंबई आणि पुण्याच्या गिर्यारोहांकडून ''शेंडी'' सुळका सर

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबई आणि पुण्याच्या १० गिर्यारोहकांकडून शेंडी सुळक्यावर यशस्वी आरोहण करण्यात आले. नऊ डिसेंबर रोजी ही मोहीम राबविण्यात आली होती.
पदभ्रमिक आणि गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या प्रसिद्ध हरिश्चंद्रगड येथील कोकणकड्याच्या खोल धारेवर आणि रोहिदास शिखराच्या कुशीत अत्यंत अवघड जागी वसलेल्या या १०० फूट उंचीच्या कठीण शेंडी सुळक्यावर त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत सावंत यांना एका वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
१९८४ मध्ये अरुण सावंत यांनी या कठीण सुळक्यावर यशस्वीपणे प्रथम आरोहण करून शिखर माथ्यावर भगवा फडकवला होता. या मोहिमेत २२ ते ५८ वर्षे या वयोगटातील १० गिर्यारोहकांचा सहभाग असून, तिचे नेतृत्व आणि अरुण सावंत यांच्या अनेक अवघड मोहिमेतील सहकारी सूरज मालुसरे या मुंबईच्या गिर्यारोहकाने केले.
या मोहिमेला जोडूनच ११ डिसेंबर या जागतिक पर्वत दिनाचे औचित्य साधून रोहिदास शिखराच्या कुशीत आणि अत्यंत अवघड जागी वसलेल्या रोहिदासची लिंगी या ३० फुटी सुळक्यावर प्रथमच यशस्वी आरोहण करण्याचा मान मिळवला.
सूरज मालुसरे यांच्यासह अरुण सावंत यांची कन्या आरुषी सावंत, स्पोर्ट्स क्लाइंबिंग मधील माजी राष्ट्रीय विजेता कार्तिक आयरे, रोहन मालुसरे, रुपेशसिंग तंवर, विनायक परब, देवव्रत फल सर्व मुंबई आणि पुण्यातील संजय शेळके, महेश दौंडकर तसेच वयाने सर्वांत मोठे असलेले मिलिंद देशपांडे यांनी यशस्वी गिर्यारोहण केले.
या मोहिमेची तळ छावणी सांभाळून गिर्यारोहकांना सहकार्य करण्यासाठी चिपळूण येथून आलेले संजोग आणि श्वेता वेलणकर यांनी मोहिमेस यशस्वी होण्यासाठी हातभार लावला.