स्वर्गीय व्हायोलिन वादनाने सजली स्वरसंध्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वर्गीय व्हायोलिन वादनाने सजली स्वरसंध्या
स्वर्गीय व्हायोलिन वादनाने सजली स्वरसंध्या

स्वर्गीय व्हायोलिन वादनाने सजली स्वरसंध्या

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः ‘पुरिया धनश्री’च्या करुण स्वरांनी नांदी झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप ‘दरबारी कानडा’च्या आर्त स्वरांनी झाला. आश्वासक सरोदवादन आणि दिग्गज व तरुण कलाकारांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. मात्र, व्हायोलिनचे स्वर्गीय सूर आणि त्यावर सादर झालेल्या पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरांनी अजरामर झालेल्या रचना, हे या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. ज्येष्ठ व्हायोलिनवादक विदुषी डॉ. एन. राजम यांनी त्यांच्या कन्या व नातींसह सादर केलेल्या अद्भुत कलाविष्काराला रसिकांनी भरभरून दाद दिली.
किराणा घराण्याचे युवा गायक अविनाश कुमार यांनी आपल्या आश्वासक गायकीने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात केली. राग पुरिया धनश्री प्रस्तुत करताना त्यांनी द्रुत तीनतालातील ‘पायलिया झंकार मोरी’ आणि एकतालातील बंदिश सादर केली. संत कबीर रचित ‘मन मन फूला फूला फिरे जगत में’ या भजनाने त्यांनी सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे, तबल्यावर पांडुरंग पवार आणि तानपुऱ्यावर आदर्श शर्मा व प्रणव कुमार यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात प्रख्यात सरोदवादक अली अकबर खाँ यांचे सुपुत्र सरोदवादक आलम खाँ यांची मैफल रंगली. आपले वडील अली अकबर खाँ आणि पं. भीमसेन जोशी यांच्या ऋणानुबंधनाला उजाळा देत त्यांनी वादनाला प्रारंभ केला. अली अकबर खाँ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मैहर सेनी घराण्यातील प्रचलित अशा ‘हिंडोल-हेम’ या मिश्र रागातील रचना सादर केल्या. राग ‘मिश्र पिलू’मध्ये रूपक तालातील गत सादर करत त्यांनी सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी समर्पक साथसंगत केली.
मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने तिसऱ्या सत्राला सुरवात करण्यासाठी पं. साजन मिश्रा व पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा मंचावर आले. यावेळी सर्वांनाच पं. राजन मिश्रा यांची उणीव जाणवली. पं. भीमसेन जोशी आमच्यासाठी गुरुतुल्य होते, त्यांचा आशीर्वाद आमच्यासह कायम आहे, असे सांगत पं. साजन मिश्रा यांनी गायनाला प्रारंभ केला. त्यांनी राग यमनमध्ये विलंबित एकतालात ‘पलकन से...’ ही रचना आणि मध्यलयीत टप ख्याल ही दुर्मीळ रचना सादर केली. ‘एरी आली पिया बिन’ ही प्रसिद्ध बंदिश व त्यानंतर तराणा सादर केला. रसिकांच्या आग्रहास्तव ‘चलो मन वृंदावन के ओर’ या भजनाने त्यांनी समारोप केला. त्यांना संवादिनीवर अजय जोगळेकर, तबल्यावर पं अरविंदकुमार आझाद आणि तानपुऱ्यावर निषाद व्यास व विरेश शंकराजे यांनी समर्पक साथ दिली.

तीन पिढ्यांचा अद्भुत स्वराविष्कार
समारोपाच्या सत्रात संगीताचा समृद्ध वारसा लाभलेल्या घराण्यातील ज्येष्ठ व्हायोलिनवादक विदुषी डॉ. एन. राजम यांच्या कन्या संगीता शंकर आणि नाती रागिणी व नंदिनी शंकर यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वरमंचावर आगमन झाले. राग ‘दरबारी कानडा’ने त्यांनी आपल्या वादनाला सुरुवात केली. व्हायोलिनच्या विस्मयचकित करणाऱ्या वादनाने त्यांनी उपस्थितांना नादब्रह्माची अनुभूती दिली. स्वरमंचावर चार व्हायोलिन वाजत असूनही जणू काही एकच व्हायोलिन वाजत आहे, असा अनुभव श्रोत्यांना आला. त्यांनी ‘माझे माहेर पंढरी...’ हा पं. भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेल्या अभंग सादर केला. तर, ‘जो भजे हरी को सदा’ या भजनाने व वादनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर मुकेश जाधव आणि तानपुऱ्यावर वैदेही अवधानी व दिगंबर जाधव यांनी साथ केली.

आजचा ‘अंतरंग’ कार्यक्रम रद्द
सरोदवादक आलम खाँ यांची शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे ‘अंतरंग’ कार्यक्रमांतर्गत आज (ता. १६) होणारी मुलाखत काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली आहे, असे आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.