‘महाराष्ट्रामुळे भारतीय संगीत जिवंत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाराष्ट्रामुळे भारतीय संगीत जिवंत’
‘महाराष्ट्रामुळे भारतीय संगीत जिवंत’

‘महाराष्ट्रामुळे भारतीय संगीत जिवंत’

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः ‘महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतीय संगीत ऐकले जाते, येथे संगीताचे अतिशय जाणकार श्रोते आहेत. महाराष्ट्रामुळे भारतीय संगीत जिवंत आहे’, असे गौरवोद्गार पं. अजय चक्रवर्ती यांनी शुक्रवारी (ता. १६) काढले. ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपल्या गायनाला प्रारंभ करण्यापूर्वी ते बोलत होते.
पं. चक्रवर्ती म्हणाले, ‘‘संगीताला तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. संगीत हे फक्त ऐकण्याचे नाही, तर पाहण्याचेही माध्यम आहे. काळजीपूर्वक पाहिले तर स्वराचा प्रवास आपल्याला दिसू शकतो. त्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून मी मुंबईत ‘टू डेव्हलप इनर व्हिजन ऑफ राग म्युझिक’ या विषयावर संशोधन करतो आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे केवळ करमणूक नाही, तर ते शिक्षण आहे. एक ‘सा’ समजला तर माणुसकी समजते. या संगीताचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. लता मंगेशकर, आशा भोसले या किती शिकल्या हे कोणी विचारत नाहीत, त्यांचे संगीत हीच त्यांची ओळख आहे. हेच संगीत आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे.’’
‘पं. भीमसेन जोशी मला वडिलांसमान होते. एक काळ होता, जेव्हा ते कोलकत्त्याला यायचे, तेव्हा मी तंबोरा घेऊन त्यांच्याकडे जात असे. १९८८ मध्ये मला ते हात पकडून इथे घेऊन आले होते. हा महोत्सव म्हणजे कलाकारांसाठी तीर्थक्षेत्र आहे. आज माझे शिष्य तुमच्यासमोर त्यांची कला सादर करत आहेत, त्यांनाही तुम्ही रसिकांनी अलोट प्रेम दिले आहे. विशेषतः, कौशिकीला दिलेल्या प्रेमासाठी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो’, अशी भावना पं. चक्रवर्ती यांनी व्यक्त केली.

ग्रीनरूममध्ये तानपुरे लावले जाताना
महोत्सवाच्या पहिल्या वर्षापासून मिरजकर कुटुंबाकडून कलावंतांना साथ करण्यासाठी तानपुरे सुरात लावून दिले जातात. विविध वाद्यांची निर्मिती व दुरुस्ती करणाऱ्या या कुटुंबातील साजिद मिरजकर म्हणाले, ‘‘माझे आजोबा इस्माइलभाई सुरुवातीला तानपुरे लावणं आणि कुठल्याही वाद्याची दुरुस्ती करावी लागल्यास तत्परतेने ती करत. त्यांच्यानंतर माझे वडील युसूफभाई व गेली अकरा वर्षे मी ही सेवा देतो आहे. महोत्सवासाठी काही तानपुरे मंडळाचे, तर काही आम्ही आणलेले वापरले जातात. या सेवेत खूप समाधान वाटतं.