अभिजात रागांच्या मैफिलीचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिजात रागांच्या मैफिलीचा आनंद
अभिजात रागांच्या मैफिलीचा आनंद

अभिजात रागांच्या मैफिलीचा आनंद

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः अलवारपणे खुलत गेलेला राग मारवा, बंदिशींचे अंतरंग उलगडत सादर झालेला राग बागेश्री आणि संतूरच्या स्वरझंकाराने ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. राहुल शर्मा व श्रीनिवास जोशी यांच्या सादरीकरणाने पं. शिवकुमार शर्मा व पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणी रसिकांच्या मनात ताज्या झाल्या. दिग्गज गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने या दिवसाची मैफिल नव्या उंचीवर नेली.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारवाने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यानंतर ‘अब काहे सतावो जावो’ हा गारा व पिलू रागातील मिश्र दादरा व पं. भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेले भजन ‘बाजे मुरलिया बाजे’ सादर केले. त्यांना संवादिनीवर अभिनय रवांदे, तबल्यावर पांडुरंग पवार आणि तानपुऱ्यावर विरेश शंकराजे व वत्सल कपाळे यांनी साथ केली.
दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व संतूरवादक राहुल शर्मा यांची मैफिल रंगली. त्यांनी हंसध्वनी रागाने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. त्यात मत ताल, नऊ मात्रा, आलाप, जोड, झाला आणि दृत तीनताल सादर केला. मिश्र खमाज धूनमध्ये दादरा आणि तीनताल सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. तबल्यावर साथसंगत करणाऱ्या ओजस अधिया यांच्यासह रंगलेल्या त्यांच्या जुगलबंदीला विशेष दाद मिळाली.
तिसऱ्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र व शिष्य श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांनी बिहाग रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यानंतर राग मिश्र खमाजमध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरप्रधान गायकीचे वैशिष्ट्य खुलवणारी ‘सूर संग रंगरलिया’ ही बंदीश सादर केली. ‘गुरुबिन कौन बतावे वाट’ या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे, तबल्यावर पं.रवींद्र यावगल, तानपुऱ्यावर वत्सल कपाळे व मुकुंद बादरायणी, पखावजवर गंभीर महाराज आणि टाळावर माऊली टाकळकर यांनी साथसंगत केली.

अभ्यासपूर्ण निवेदनासह रंगली मैफिल
तिसऱ्या दिवसाचे समारोपाचे सत्र ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी आपल्या भारदस्त आवाजाने खुलवले. राग बागेश्रीने त्यांनी आपल्या सादरीकरणाला प्रारंभ केला. त्यानंतर पहाडी राग सादर करत गायत्री मंत्राने गायनाची सांगता केली. सादरीकरणा दरम्यान बंदिशींचे वैशिष्ट्य आणि बारकावे उलगडून दाखवणारे अभ्यासपूर्ण निवेदन, हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले. संवादिनीवर आणि तबल्यावर साथसंगत करकणाऱ्या कलाकारांच्या किमयांना वेळोवेळी दाद देत रसिकांचेही त्याकडे लक्ष वेधून घेतले. त्यांना संवादिनीवर अजय जोगळेकर, तबल्यावर ईशान घोष आणि तानपुऱ्यावर सौरभ काडगावकर व मेहेर परळीकर यांनी साथसंगत केली.

मी पुण्यात पहिल्यांदा गायन सादर करत आहे. ‘सवाई’चा मंच प्रत्येक संगीत साधकांसाठी तीर्थासमान आहे. या ठिकाणी मी आज पूजा करण्यासाठी बसले आहे. माझ्या कलेसाठी मला रसिकांचे आशीर्वाद लाभोत, अशी इच्छा आहे.
- मनाली बोस, गायिका