आपुलकी अन् मायेची अनोखी चव... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपुलकी अन् 
मायेची अनोखी चव...
आपुलकी अन् मायेची अनोखी चव...

आपुलकी अन् मायेची अनोखी चव...

sakal_logo
By

अंजलीची गाडी वाहतूक कोंडीत अडकल्यावर तिची चिडचिड वाढली. सासूबाई आपली वाट बघत बसल्या असतील, या विचाराने ती चिंतेत पडली. शनिपाराजवळ आल्यानंतर तिने आठवणीने त्यांच्यासाठी बाकरवडी घेतली. नेहमीपेक्षा ती आज थोडी उशिरा घरी पोचली.
‘‘आई, कशी आहे तब्येत?’’ तिने काळजीने विचारलं.
‘‘ताप आता उतरलाय पण तोंडाला चव नसल्याने काही खाऊशी वाटत नाही.’’ सासूबाईंनी म्हटले. त्यानंतर अंजलीने डिशमध्ये बाकरवडी आणून त्यांच्यासमोर ठेवली. बाकरवडी पाहताच त्यांचा चेहरा उजळला. ती खाल्ल्यानंतर त्यांना बरं वाटलं. अंजलीने थर्मामीटर काढून त्यांचा ताप मोजला.
‘‘आई, ताप आहे की. औषधे घेतली नाहीत का?’’, असे म्हणून अंजली त्यांच्यावर रागावली. मग तिनेच औषधांचा डोस दिला. डोक्याला बाम चोळला आणि ती पाय चेपून देऊ लागली.
‘‘अंजली, अगं तू ऑफिसमधून दमून आली आहेस. तू आराम कर.’’ सासूबाईंनी म्हटले. ‘‘आई, कशाची दमलेय. तुमच्यापुढं सगळा थकवा पळून जातो. मला तुमच्यामुळेच सुखाचे दिवस लाभलेत, हे मी कसं विसरु. तुम्ही आजारी असल्यावर तुमची थोडी फार सेवा केली तर बिघडतेय काय?’’ अंजलीने म्हटले.
‘‘आई, तुमच्या आवडीचे थालीपीठ मी करतेय. त्यामुळे तुमच्या तोंडाला चव येईल.’’ असे म्हणून ती किचनमध्ये गेली. तिला पंधरा वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. तिची दहावीची मार्कलिस्ट पाहून सासूबाईंना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ‘‘अगं दहावीत तुला ९१ टक्के मार्क असताना तू शाळा मध्येच का सोडलीस?’’ असं सासूबाईंनी विचारल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. आई देवाघरी गेल्यानंतर थोरली असल्याने घरातील सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर पडली. धाकट्या भावंडांचे करताना तिचे शिक्षण अर्धवटच राहिले. कधीतरी तिला आपले शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत वाटायची. मात्र, सासूबाईंनी नेमके त्यावर बोट ठेवल्याने तिला अश्रू अनावर झाले. त्यावर तिची समजूत काढत सासूबाई म्हणाल्या, ‘‘अगं काय योगायोग आहे बघ. माझे शिक्षणही दहावी पास आहे. आता आपण दोघीही एकाच कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेऊ.’’ असे म्हणून सासूबाईंनी दोघींचे फॉर्म भरले. सुशांतनेही दोघींना प्रोत्साहन दिले. त्यानंतर दोघीही घरातील सगळी कामे आटोपून कॉलेजला जात. या दोघी सासू-सुना आहेत, असा संशयही कॉलेजमध्ये कोणाला आला नाही. दोघी खास मैत्रिणी आहेत, असंच सगळ्यांना वाटायचं. दोघीही बारावी उत्तम मार्कांनी पास झाल्या. त्यानंतर एकमेकींना सांभाळून घेत दोघीही प्रथम श्रेणीत बीए झाल्या. निकालाच्या दिवशी कॉलेजच्या आवारात गठ्ठ मिठी मारून दोघींनी आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन दिली. त्यानंतर एकमेकींना पार्टी देत वैशाली हॉटेलमध्ये पदवी मिळवल्याचा आनंद लुटला. पुढे अंजलीने एमए केले. काही दिवसांतच तिला क्लासवन ऑफिसरची नोकरीही मिळाली. सासूबाईंच्या पाठिंब्यामुळे आपल्याला हे यश मिळाले, याची जाणीव तिला होती. ती नोकरीला गेल्यानंतर लहान मुलांसह घरची सगळी आघाडी सासूबाई समर्थपणे सांभाळत असत. त्यामुळे तिला कसलीच चिंता नव्हती. आपली आई लवकर देवाघरी गेली पण परमेश्वराने सासूबाईंच्या रुपात आईच दिली, अशी तिची भावना झाली. थोड्यावेळाने अंजलीने गरमागरम थालीपीठ सासूबाईंना करुन आणले. बिछान्यावरुन त्यांना उठवून बसवत अंजली त्यांना थालीपीठ भरवू लागली. आपुलकी, माया आणि काळजीने ओतप्रोत भरलेल्या थालीपीठाची चव सासूबाईंना जाणवत होती.