सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : समारोपाच्या दिवशी त्रिवेणी कलाविष्कार डॉ. प्रभा अत्रे यांच्या चिरतरुण स्वरांनी ‘सवाई’ची भैरवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : समारोपाच्या दिवशी त्रिवेणी कलाविष्कार
डॉ. प्रभा अत्रे यांच्या चिरतरुण स्वरांनी ‘सवाई’ची भैरवी
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : समारोपाच्या दिवशी त्रिवेणी कलाविष्कार डॉ. प्रभा अत्रे यांच्या चिरतरुण स्वरांनी ‘सवाई’ची भैरवी

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : समारोपाच्या दिवशी त्रिवेणी कलाविष्कार डॉ. प्रभा अत्रे यांच्या चिरतरुण स्वरांनी ‘सवाई’ची भैरवी

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : कर्नाटकी व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायन, मनमोहक बासरीवादन आणि अभिजात शास्त्रीय नृत्यप्रकार असलेल्या कथकचे सादरीकरण, असा त्रिवेणी कलाविष्कार ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी रसिकांना पाहायला मिळाला. आनंद भाटे यांचे दमदार गायन आणि महेश काळे व संदीप नारायण यांची जुगलबंदी हे या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी आपल्या चिरतरुण स्वरांनी ‘सवाई’ची भैरवी केली. परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांनी गायलेल्या ध्वनिफितीने या स्वरयज्ञाची पूर्णाहुती अर्पण झाली.

रसिकांच्या अलोट गर्दीत रविवारी सगळ्या कलाकारांचे सादरीकरण झाले. या दिवशी दुसऱ्या सत्रात बनारस घराण्याचे राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन झाले. ‘‘पुण्यात बरेचदा आलो आहे, पण आज पहिल्यांदा सवाईत प्रस्तुती करत आहे,’’ असे सांगत त्यांनी राग ‘अलया बिलावल’द्वारे वादनाची सुरुवात केली. त्यामध्ये विलंबित गत, द्रुत गत सादर करत हळूवारपणे या रागाची उकल केली. त्यानंतर पहाडी धून सादर करत बनारसी दादराने वादनाचा समारोप केला.

तिसऱ्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन झाले. ‘‘गुरुजींनी फार कष्टाने हा कल्पवृक्ष जोपासला आहे. त्या कल्पवृक्षाच्या छत्रछायेत आज आम्ही सर्व कलाकार वृद्धिंगत होत आहोत,’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भीमपलास रागाने त्यांनी गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये ‘अब तो भई तेर’ ही विलंबित बंदिश, ‘मिल जाना राम पियारे’ ही तीनतालातील बंदिश आणि ‘कटे ना अब बिरहा की रात’ ही पिलू रागातील ठुमरी त्यांनी सादर केली. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या लोकप्रिय भजनाने त्यांनी आपल्या गायनाला विराम दिला.

उत्तरार्धातील सत्रात कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी आपल्या भावस्पर्शी कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी ‘श्रीराम स्तुती’ने नृत्याविष्काराला प्रारंभ केला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, दोन स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केली. धीरगंभीर अशा ‘श्रीराम कथा’ सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली.

‘स्वरयोगिनी’ला सलाम
वयाची नव्वद वर्षे पूर्ण केलेल्या डॉ. प्रभा अत्रे अखेरच्या सत्रात सादरीकरणासाठी स्वरमंचावर आल्या, तेव्हा रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या ‘स्वरयोगिनी’ला सलाम केला. गेली अनेक वर्षे त्यांच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समारोप होते. मात्र, २०१९ ला त्यांची प्रकृती ठीक नसल्याने व गेली दोन वर्षे कोरोनामुळे महोत्सव न झाल्याने चार वर्षांनी त्या ‘सवाई’च्या मंचावर सादरीकरणासाठी आल्या. ‘‘गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे खोकल्याचा त्रास होत आहे, त्यामुळे सांभाळून घ्या,’’ असे आवाहन करत त्यांनी सादरीकरणाला प्रारंभ केला. राग ‘भैरवी’मधील तराणा, ‘प्रभूजी घर कब आओगे’ ही बंदिश आणि ‘पिया बिन आवत नाही चैन’ या ठुमरी त्यांनी सादर केल्या. ‘जगत जननी भवतारिणी, मोहिनी तू नवदुर्गा’ या रचनेने त्यांनी सांगता केली.

संगीत हे केवळ शास्त्र नाही, करामत नाही, कसरत नाही. ते मनोरंजनाचे साधन नाही, हे आपण ध्यानात ठेवायला हवे. संगीत म्हणजे अविनाशी आनंद देणारा खळाळता झरा आहे. या जगात जे जे सुंदर, मंगल, शाश्वत आहे, त्याची जाणीव करून देणारा हा झरा आहे. एक जबाबदार कलाकार म्हणून हा संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. संगीत परंपरेत काळानुरूप जे बदल झालेत, ते बदल शास्त्र आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून, त्याप्रमाणे मी बदल करत आले आहे. त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. पण त्यामध्ये नव्याने विचार सुरू होईल, अशी मला खात्री आहे.
- डॉ. प्रभा अत्रे