
‘एसआरए’त गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला सव्वाकोटीला गंडा
पुणे, ता. १९ ः शिवाजीनगर येथील मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पात (एसआरए) गुंतवणूक करण्यास सांगून जादा परतावा मिळण्याचे आमिष दाखवित विकसकाने एका व्यावसायिकाची एक कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर चंदुलाल परमार (वय ७०), सनत ईश्वर परमार (४६) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे. या प्रकरणी पंकज गुल जगासिया (वय ४३) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगासिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईश्वर परमार व सनत परमार हे ‘एसआरए’चे विकसक व बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा येथील जागेत २००९ पासून प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. रहिवाशांची ९० टक्के संमती मिळाली होती. मात्र मेट्रो प्रकल्पामुळे तेथे प्रकल्प होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना संबंधित जागेवर विकसनाचे अधिकार मिळाले नव्हते. दरम्यान, दोघांनी जगासिया यांच्याशी संपर्क साधून संबंधित प्रकल्पात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे सांगून त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार एक कोटी २१ लाख ४० हजार रुपये धनादेश व ‘आरटीजीएस’द्वारे ‘मे. ईश्वर कन्स्ट्रशक्न प्रा.लि’ या नावाने कोटक महिंद्रा बॅंकेत जमा केले. परंतु तेथे कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यात आले नाही.