
मी माझ्या मनाची राणी व्यक्तीस्वातंत्र्यांची कहाणी
मी माझ्या मनाची राणी आहे. कोणाच्या बंधनात राहणं मला अजिबात आवडत नाही. मी कोठे जायचे, हा माझा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मी कोठे चालले आहे, याची माहिती मी दुसऱ्यांना का देऊ? त्यामुळे स्कुटी चालवत असताना मला वळायचे असेल तर मी अजिबात इंडिकेटर देत नाही. मला वळायचे असेल, त्यावेळी मी माझ्या मर्जीने वळते. त्यात दुसऱ्यांना काय कळवायचंय. त्यातही डावीकडे इंडेकेटर दाखवल्यावर मी डाव्या विचारसरणीचा आहे की काय अशी शंका मला येते, उजव्या इंडिकेटरबाबतही तसेच आहे. मी उजव्या विचारसरणीकडे झुकले आहे, असा भास मला होऊ लागतो. त्यामुळे डाव्या-उजव्या विचारसरणीचा मनात विचार येण्याऐवजी वळताना इंडिकेटर न दाखवलेलाच बरा असतो.
‘ताई वळताना किमान हात तरी दाखवा’ अशी विनंती मागे एका वाहतूक पोलिसाने केली होती. मात्र ‘हात दाखवून अवलक्षण कशाला?’ हा विचार माझी पाठ सोडत नाही. मी हाताने केलेल्या खुणेचा अनेक तरुण गैरअर्थ काढतात. काही महिन्यांपूर्वी माझे मौनव्रत होते. त्यावेळी आमच्या सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील एका तरुणाने मला काहीतरी विचारले. त्यावेळी मी उजव्या हाताची बोटे ओठांवर ठेवून, नंतर ती हवेत उडवून ‘माझे मौनव्रत आहे’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी फ्लाईंग किस देत आहे, असा त्याचा गैरसमज झाला व त्यानेही तशी परतफेड केली. हा प्रकार बघून सोसायटीतील अनेकांचा माझ्याविषयी गैरसमज झाला. माझ्या मनात तसे काही नाही, हे पटवून देताना माझ्या नाकीनऊ आले होते. तेव्हापासून मी हाताने खाणाखुणा करण्याचा धसका घेतला आहे. कोणीतरी ‘थांब’ किंवा ‘जा’ असा इशारा दिल्यानंतरच आपण त्याची अंमलबजावणी करावी, हे मला पटत नाही. काही व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे आहे की नाही. कोणाच्या परवानगीची वाट पहाणं माझ्या रक्तात नाही आणि कोणाच्या इशाऱ्यावर नाचणंही मला जमत नाही. त्यामुळेच सिग्नलला लाल दिवा लागला म्हणून मी कधी थांबत नाही. उलट हिरवा दिवा लागल्यानंतर थांबायचं मनात आले तर मी लगेच थांबते. कधी थांबायचे आणि कधी सुटायचं, मेरी मर्जी! माझ्या स्कुटीला हॉर्न आहे पण मी तो कधीही दाबत नाही. एखाद्याला असं दाबून ठेवणं, मुस्कटदाबी करणं हे क्रौर्य आहे. देवाने आपल्याला तोंड कशासाठी दिलंय? स्कुटी चालवताना तोंडही चालवता आले पाहिजे, हा नियम आरटीओने केला पाहिजे. तो नियम होईल, तेव्हा होईल. मी मात्र अंमलबजावणी सुरु केली आहे. चुकीची गाडी चालवणाऱ्याला ‘ए मूर्खा, ‘बिनडोक’, ‘बैल’ अशी विशेषणे वापरून, वाहतुकीला शिस्त लावते. हॉर्नने जी किमया साधणार नाही, ती अशा दोन-चार शब्दाने साधली जाते. पुरुष ज्या दुचाकी गाड्या चालवतात, त्यांचे ब्रेक पायात असतात आणि आम्ही बायका स्कुटीसारख्या गाड्या चालवतो, त्यांचे ब्रेक हातात असतात. स्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करता आणि गाड्यांमधील ब्रेकमध्ये फरक करता. हा आमच्यावरील अन्याय नाही का? त्याविरोधातच मी बंड पुकारले आहे. मी माझी स्कुटी कधीही हाताने ब्रेक दाबून थांबवत नाही तर पायाने ब्रेक मारून थांबवते. भले मला त्यासाठी दर महिन्याला नवीन चप्पल घ्यावी लागली तरी हरकत नाही. जमिनीला चप्पल घासून गाडी थांबवणे, हे ऐरा-गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. मैत्रिणींबरोबर मोबाईलवर मनोसक्त गप्पा मारणे, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. गप्पा मारताना वेळ-काळ याचेही बंधन मी पाळत नाही. त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर मैत्रिणींशी गप्पा मारल्या तर बिघडले कोठे? उलट गाडी चालवतानाच आमच्या गप्पा चांगल्या रंगतात, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी तर अनेकदा गप्पा मारण्यासाठीच गाडी चालवते. (‘बिनधास्त बोल’ या स्वरालीने लिहिलेल्या डायरीतील चुरगळलेली काही पाने आम्हाला कचराकुंडीत सापडली होती. त्यातील निवडक भाग.)