झुकती हैं दुनिया झुकानेवाला चाहिए... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झुकती हैं दुनिया
झुकानेवाला चाहिए...
झुकती हैं दुनिया झुकानेवाला चाहिए...

झुकती हैं दुनिया झुकानेवाला चाहिए...

sakal_logo
By

‘‘मला पंचवीस हजार रुपये तातडीने हवेत. या माझ्या नव्या मोबाईल नंबरवर गुगल पे कर,’’ शुभमचा मेसेज वाचल्यानंतर दिलीपने त्याकडे दुर्लक्ष केले. ‘‘याचंही अकाऊंट हॅक झालं वाटतं’’, असा त्याने विचार केला. मात्र, तासाभराने पुन्हा मेसेज आल्याने तो वैतागला. ‘‘अरे तू स्वतःसमोर आलास तरी मी तुला पैसे देणार नाही. ‘गुगल पे’च्या कशाला गोष्टी करतोस?’’ असं त्याने उत्तर दिले. मग मात्र, शुभमने फोन केला व ‘मी सोलापूरला एका कामासाठी आलो आहे. मात्र, मला तातडीने पंचवीस हजार रुपये हवे आहेत. या फोन नंबरवर ते पाठवून दे’ असं त्याने दिलीपला सांगितले. शुभमचा आवाज ऐकून मात्र तो आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची दिलीपला खात्री पटली.
‘‘तू पाठवलेल्या मोबाईल क्रमांकावर थोड्यावेळाने पैसे पाठवतो,’’ अशी ग्वाही त्याने दिली. त्यानंतर त्याने पंचवीस हजार रुपये पाठवून दिले. मात्र, तासाभराने शुभमचा फोन आला. ‘‘हीच का भावा आपली मैत्री? पंचवीस हजारांसाठी तू आपल्या मैत्रीवर अविश्वास दाखवलास. तुझं वागणं, बरं नव्हे.’’ शुभमने असं म्हटल्यावर दिलीपला मोठा धक्का बसला. ‘‘अरे मी पैसे पाठवले आहेत.’’ असे त्याने म्हटले. मात्र, आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले नसल्याचे शुभमने सांगितल्यावर दिलीप काळजीत पडला. पैसे पाठवलेला नंबर त्याने दोन-तीन वेळा तपासला. त्यावेळी आपण चुकीच्या नंबरवर पैसे पाठवल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब पैसे पाठवलेल्या क्रमांकावर फोन केला. मात्र, पलीकडील व्यक्तीने तो उचलला नाही. त्यानंतर त्याने पाच-सहा वेळा फोन केला. मात्र, त्याला पलीकडून प्रतिसाद मिळाला नाही. ‘एवढे पैसे मिळाल्यावर कोण कशाला फोन उचलेल? आता ती व्यक्ती कशाला पैसे परत करील. थोड्यावेळाने बहुतेक ती व्यक्ती फोन स्वीच ऑफ करील, अशी भीती दिलीपला वाटली. आपल्या एका चुकीमुळे पंचवीस हजार रुपये पाण्यात गेल्याने त्याची चिंता वाढली. आता काय करावे, हा मोठा गहन प्रश्न त्याला पडला. मग त्याने त्या क्रमांकावर मेसेज पाठवला. ‘‘लष्कराची-भाकरी-तव्यावर’’ या अतिरेकी संघटनेचे पंचवीस हजार रुपये घेऊन सभासदत्व स्वीकारल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. पाकिस्तानातील ‘लष्करी-ए-तैयबा’ या अतिरेकी संघटनेची ही महाराष्ट्रातील शाखा आहे. या पैशांतून आपण शस्त्रास्त्रे व इतर खर्च भागवावा. मात्र, हे करताना पोलिसांपासून सावध राहावे. तसेच आपल्या हालचाली इतरांना संशयास्पद वाटणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच मोबाईलचा वापरही काळजीपूर्वक करावा. लष्कराच्या भाकरी तव्यावर कशा भाजाव्यात, याविषयीच्या सूचना आम्ही सांकेतिक भाषेत देत राहू. मात्र, आपल्या अतिरेकी संघटनेचे काम करत असताना डोळ्यांत ‘रॉकेल’ घालून काळजी घ्यावी, अन्यथा जिवाला मुकाल.’’ हा मेसेज वाचून पलीकडील व्यक्ती घाबरली. ‘‘मला तुमच्या संघटनेचे सभासद व्हायचे नाही,’’ असा मेसेज त्याने पाठवला. ‘‘सभासदत्व रद्द करायचे असल्यास पंचवीस हजार रुपये परत पाठवावेत.’’ दिलीपने मेसेज पाठवला. पुढच्या दोन मिनिटांत खात्यावर पंचवीस हजार रुपये जमा झाल्याचे पाहताच दिलीपने स्वतःची पाठ थोपटून घेतली.