मुलांसाठी ओरिगामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांसाठी ओरिगामी
मुलांसाठी ओरिगामी

मुलांसाठी ओरिगामी

sakal_logo
By

कागदाच्या प्रमाणबद्ध घड्या घालणं, त्या उलगडणं, जोडणं या जपानी कलाप्रकारातून असंख्य कलाकृती जगभर साकारल्या जातात. पुण्यातील नेहा सुगवेकर या सारसबागेसमोरील बालभवनमध्ये मुलांना ओरिगामी शिकवतात. मुलांमध्ये यातून नीटनेटकेपणा, सौंदर्यदृष्टी व उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करण्याची सवय आपसूकच रुजत जाते.
- नीला शर्मा

नेहाताई म्हणाल्या, ‘‘कागदाची उभी, आडवी, तिरकी घडी घालणं, ती उलगडून दुसऱ्या बाजूने पुन्हा घडी घालणं, दुमडलेल्या बाजू एकमेकांत गुंतवणं यांसारख्या कृतींमधून मुलांच्या बोटांच्या हालचाली जेवढ्या जास्त होतील, तेवढंच मेंदूच्या विकासासाठी चांगलं, असं म्हटलं जातं. ओरिगामी कलाकृती घडवतानाची प्रक्रियाही आनंददायी असते. हातातील कागदाला वेगवेगळा आकार कलाकार देत असतो. यातून कलाकृती तयार झाल्यावर पूर्णतेचं समाधान मिळतं. यातून मन शांत झाल्याची अनुभूती मिळते. प्रत्येक कलेत एक शिस्त असते. ओरिगामीत गरजेनुसार कागदाची टोकं किंवा कडा नीट जुळवणं, घड्यांचा क्रम लक्षात ठेवणं, शिकवणारा करून दाखवत असेल ते एकाग्रतेनं ऐकणं, बघणं, त्याच पद्धतीने स्वतः करून पाहणं, सरावाने त्यात सफाई आणणं आदींतून येणारा व्यवस्थितपणा आयुष्यभर उपयोगी पडतो. यासाठी मी आवर्जून मुलांना ओरिगामी शिकवते.’’
नेहाताईंनी असंही सांगितलं की, ओरिगामीचं तंत्र साधं सोपं करून मी सांगते. समजा पक्षी तयार करायचा असेल तर तीन वर्षांच्या मुलांना जमेल इतपतच सोप्या घड्यांची साधी कलाकृती शिकवते. आणखी दोन वर्षांनी मोठ्या मुलांसाठी थोडं जास्त काम करावं लागेल, अशी कृती निवडते. सात वर्षांच्या मुलांना आणखी अवघड घड्यांचं काम शिकवते. वय व सरावानुसार त्यांना विशिष्ट मर्यादेपलिकडे नेणारी काठिण्यपातळी कलाकलाने वाढवत नेते. मुलांनी ही कला जोपासताना स्वतःच पसारा आवरावा, आईवर ती जबाबदारी टाकू नये; हेही मी त्यांच्या मनावर बिंबवते. कलाकृती तयार झाल्यावर ती घरात, मित्रमैत्रिणी व शिक्षकांना दाखवून ओरिगामीचा आनंद सगळ्यांबरोबर वाटायला सांगते. फुलं, पक्षी, फोटो फ्रेम, डब्या वगैरे शिकवताना साहित्य कल्पकतेने वापरायला सांगते. सण अथवा विशेषप्रसंगी साजेशा कलाकृती घडवते.

बालभवनमधील माझा कक्ष ओरिगामीच्या कलाकृतींनी नटलेला असतो. मी करत असलेल्या नवनवीन रचनांबरोबरच मुलंही सुंदरशा कलाकृती घडवून माझ्या टेबलावर आणून ठेवतात. मुलं जेव्हा त्यांच्या मित्रांना कलाकृती घडवायला शिकवतात, तेव्हा मलाही परिपूर्ती जाणवते.
- नेहा सुगवेकर