
किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार
पुणे, ता. २५ : किरकोळ कारणावरून एकाने तरुणावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री साडेनऊ वाजता सॅलिसबरी पार्क परिसरात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकास अटक केली आहे.
सुदिन विश्वास सोनवणे (वय ३९, रा. इंदिरानगर, गुलटेकडी ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे, तर मकरंद भीष्माचार्य कबाडे (वय ३६ ) असे गंभीर जखमीचे झालेल्याचे नाव आहे. कबाडे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी किरण कबाडे (रा. घोरपडे पेठ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मकरंद व संशयित सुदिन हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघे जण सॅलिसबरी पार्क परिसरातील रिक्षा थांब्यावर शुक्रवारी रात्री थांबले होते. त्यावेळी मकरंदने घरातील वादाची माहिती सुदिनला दिली. ‘घरातील वाद बाहेर सांगत नको जाऊ’, असे सांगून सुदिनने मकरंदला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. सुदिनने मकरंदवर चाकूने वार केले. दरम्यान, स्वारगेट पोलिसांनी पसार झालेल्या सुदिनला तत्काळ अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.