ब्रह्मज्ञान झालेले सगळेच ब्राह्मण : प्रभुणे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कारांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रह्मज्ञान झालेले सगळेच ब्राह्मण : प्रभुणे 
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कारांचे वितरण
ब्रह्मज्ञान झालेले सगळेच ब्राह्मण : प्रभुणे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कारांचे वितरण

ब्रह्मज्ञान झालेले सगळेच ब्राह्मण : प्रभुणे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कारांचे वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : बहुजन समाजात ज्ञानवान, समृद्ध व्यक्ती भारताच्या कानाकोऱ्‍यात सापडतील. या समाजाने भारताला मोठं केलं आहे. ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये, या म्हणीचा शोध घेताना मला ऋषीची कुळं भटक्या विमुक्तांच्या पालांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये, लोहार-वडार यांच्यात अशी जागोजागी दिसली. हे सगळे एकाअर्थी ब्राह्मणच आहेत, कारण ब्रह्मज्ञान झालेले सगळेच ब्राह्मण आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी रविवारी केले.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, संस्थेचे अध्यक्ष सुरेश धायगुडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या वेळी राजदत्त यांना ‘ऋग्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मयूरी अत्रे, शिवानी दसक्कर, डॉ. अतिंद्र सरवडीकर यांना प्रमिलाबाई देशपांडे यांच्या स्मरणार्थ संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, गिरगाव,’ ‘अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था’ आणि ‘श्री शुक्ल यजुःशाखीय माध्यंदिन महाराष्ट्र ब्राह्मण सभा’ या संस्थांना सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘‘हा पुरस्कार म्हणजे माहेरचा आहेर आहे,’’ अशी भावना राजदत्त यांनी व्यक्त केली. सुनील पारखी यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पानसे यांनी आभार मानले.

‘माणूस यंत्रवत होत आहे’
‘‘अलीकडे माणूस यंत्रवत होत आहे. माणुसकी, समाजासाठी काही करणे, आपला वेळ देणे, याचा विसरच पडला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरची धावपळ मी पाहतो. अक्षरशः हजारो लोक तिथे एकमेकांसमोरून जात असतात. पण समोरच्या व्यक्तीला ओळख देण्याइतका वेळही त्यांच्याकडे नसतो. कोणी पडला, तर त्याला हात देण्याची उसंतही नसते. हे दुर्दैवी आहे,’’ अशी खंत राजदत्त यांनी व्यक्त केली.

०९१२९