
कल्पनाशक्तीची अजिंक्य भरारी
नऊ महिन्यांचा असताना अजिंक्य पडला आणि मेंदूला मार लागून त्याच्या शारिरीक-मानसिक विकासात अडथळे निर्माण झाले. वयाच्या पाचव्या वर्षी बोलणं सुरू झालेला हा मुलगा आता सात वर्षांचा आहे. कल्पनाशक्तीचा अद्भुत आविष्कार असलेली त्याची चित्रं अक्षरशः थक्क करतात.
- नीला शर्मा
अजिंक्यच्या आईचं नाव मनस्वी संदीप बाबर. त्या इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदवीधर आहेत. मुलाच्या संगोपनासाठी त्या पूर्ण वेळ त्याला ऊर्जा पुरवत असतात. त्याला चित्रकलेत असणारी गती विस्मयकारक आहे. मनस्वी म्हणाल्या, ‘‘मी स्वतः फार पूर्वी चित्रकलेच्या दोन परीक्षा दिलेल्या आहेत. पण मलाही आश्चर्य वाटावं, अशी चित्रं तो काढतो. कागद आणि पेन्सिल, पेन, रंगीत खडू हाच त्याचा विरंगुळा. त्याच्या मनात चाललेल्या गोष्टी त्याच्या चित्रांमधून प्रकटतात. त्याच्या बाबांनी त्यांच्या मोबाइलमध्ये त्याच्यासाठी एक ॲप डाउनलोड केलं आहे. याच्या साह्याने अजिंक्य मोबाइलवर कित्ती तरी वेळ रंगीत चित्रं काढत बसतो. सुमारे पाचशे चित्रं त्याने आतापर्यंत साकारली आहेत. त्यात कधी प्राणी, पक्षी असतात. कधी एखादा प्रसंग त्याने रेखाटलेला दिसतो. एका झाडाच्या ढोलीत एक पक्षी आणि फांदीवर बसलेली खार त्याने चितारली आहे. तिला भेटायला एक अळी आली आहे. यात झाड, फांदी, खार, अळी यांचे मजेशीर आकार व नेमक्या रंगांचा केलेला वापर आश्चर्यकारक आहे. हत्ती तो बरेचदा काढतो आणि तोही निळ्या रंगात.’’
मनस्वीताई यांनी असंही सांगितलं की, अजिंक्यला अंधाराची भिती वाटते म्हणून त्याने एका चित्रात अंधार व उजेडाची मांडणी केलेली पाहूनही मी स्तिमित झाले होते. कागदावर चित्र काढतानाही त्यात तो त्रिमिती परिणाम साधतो. कुणीही शिकवलेलं नसताना तो हा सगळा कलाविष्कार कसा करू शकतो, हे न सुटलेलं कोडं आहे. त्याच्या हालचाली वयाच्या मानाने कमी होतात. तो अगदी एकटा राहू शकत नाही. मुलांसाठीच्या रंजनकेंद्रात मी त्याला नेते. इतर मुलांसोबत थोडा वेळ राहिला की, लगेच तो मला घेऊन आत बसलेल्या ताईंकडे येतो. कागद पेन्सिल मागतो आणि चित्र काढण्यात दंग होतो. गणेशोत्सवाची तयारी करताना या केंद्रात मुलांना आपापली गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाडूमाती दिली होती. अजिंक्यने स्वतःच्या मनाने त्यातून सुबक हत्ती घडवला. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. तो हत्ती गणपतीसमोर आरास करताना फारच उठून दिसला. त्याला तळजाई टेकडीवर फिरायला आवडतं. तेथे तो निरनिराळ्या झाडा, दगडांचे आकार व रंग न्याहाळत असतो. घरी आल्यावर निसर्ग त्याच्या चित्रात अवतरतो. त्याला हालचाली व संवादात काही मर्यादा येत असल्या तरी त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी आमच्या कल्पनेपलिकडची आहे.
१) अजिंक्यचा कलाविष्कार बघताना आई (मनस्वी बाबर).
२) अजिंक्यने मोबाइलवर साकारलेली मोहक चित्रं