
मुलांसाठी भारताच्या संविधानाची तोंडओळख
भारताची राज्यघटना, भारतीय घटना, भारताचं संविधान या नावांनी ओळखला जाणारा दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे; हे शाळकरी वयातच मुलांना सोपे करून सांगण्यासाठी कृतार्थ शेवगावकर संवादसत्र घेतो. या तरुणाला नाट्यक्षेत्राचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी करण्याची विलक्षण ओढ आहे.
- नीला शर्मा
कृतार्थ म्हणाला, ‘‘मूळचा मी औरंगाबादचा असून तेथेच मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. तेथील सूर्यकांत सराफ यांच्या ''शिल्पकार'' संस्थेत नाटकांची शिबिरं, कार्यशाळा, अभिनय वगैरेचा अनुभव घेतला. नाटकाबद्दल बालपणापासून आवड या संस्थेमुळे वाढली. याचं शिक्षण घ्यावं, यातील नवनवे प्रवाह कळावेत, आपल्याला यात स्वतःला आजमावून बघता यावं ; या उद्देशाने पुण्यात आलो. मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून पोटापाण्यासाठी नोकरी पत्करून नाट्यक्षेत्रात मुशाफिरी सुरू केली. काही सामाजिक नाटकांमध्ये भूमिका केल्या. वास्तववादी अभिनयाची तंत्रं व मंत्र शिकलो. याने माझा दृष्टिकोन बदलला. सामाजिक भान जागृत झालं. पुरोगामी विचार, साहित्य, दलित साहित्य वगैरे वाचू लागलो. लोकांना समता, बंधुता, स्वातंत्र्य आदींबाबत जागरूक करण्यासाठी भारतीय संविधानाची प्रास्ताविका, उत्तम साधन ठरेल असं वाटलं.’’
कृतार्थने स्पष्ट केलं की, आधी शाळांमध्ये जाऊन आम्ही या प्रास्ताविकेचं वाचन करून, मुलांशी त्याबाबत चर्चा करायचो. दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश व हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रथम सरन्यायाधीश लीला (लैला) सेठ यांनी ‘We the Children of India’ हे अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. त्यावर आधारित ''आम्ही भारतीय मुले'' हा गाणी, गोष्टी, समाविष्ट असलेला नवा आकृतीबंध आम्ही तयार केला.
यात नाट्य आहे, पण नाटकासारखे लिखित संवाद नाहीत. ते दर वेळी बदलते असतात. पण मुद्दे मात्र कायम असतात. समानता, आपली कर्तव्यं, स्वातंत्र्य या शब्दांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला अर्थ आम्ही सोपा करून सांगतो. या नाट्यमय सादरीकरणात माझ्यासोबत महेंद्र वाळुंज, राम सैदपुरे, वर्धन देशपांडे व गौतमी अहेर असतात. घोकंपट्टी करून रोज वाचलेली प्रास्ताविका मुलांच्या दैनंदिन जीवनात उतरावी, हीच तळमळ असते. इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी आम्ही हे सादरीकरण करतो. या पिढीला सामाजिक परिवर्तनासाठी डोळस करण्याची गरज आहे. त्यांना स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मूल्यं नीट कळली तर भावी काळात बरंच काही उत्तमोत्तम घडू शकेल.
(डावीकडून) महेंद्र वाळुंज, राम सैदपुरे, वर्धन देशपांडे, गौतमी अहेर व कृतार्थ शेवगावकर अभिवाचन करताना.