संगीतातून दाखविला आश्वासक ‘वारसा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगीतातून दाखविला आश्वासक ‘वारसा’
संगीतातून दाखविला आश्वासक ‘वारसा’

संगीतातून दाखविला आश्वासक ‘वारसा’

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : बेंगळुरूमधील चैत्राली शेवलीकरचे गायकी अंगाचे व्हायोलिनवादन व पुण्यातील सानिका कुलकर्णी हिचे गायन यामुळे ‘वारसा’ या मैफलीतून युवा पिढीच्या या दोन प्रतिनिधींचे सादरीकरण आश्वासक ठरले.
शनिवार पेठेतील विष्णू विनायक स्वरमंदिरात, भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय व बाबूराव पुसाळकर स्मृती संगीत गुरुकुल आयोजित हा कार्यक्रम अनोखा ठरला. प्रारंभी चैत्रालीने गोरखकल्याण रागातील बंदिशीतून रागाचे माधुर्य नेटकेपणाने मांडले. आजोबा व्ही. आर. शेवलीकर यांच्याकडून बालपणीच व्हायोलिनवादन आत्मसात केलेल्या चैत्रालीने नंतर (वडिलांकडून) गायकी अंगाचे धडे घेतले. गोरख कल्याणमधील विलंबित, मध्य व द्रुत लयीतील तीन रचनांमधील लयकारी, गमकेच्या तानांची आरास खास होती. ‘अबीर गुलाल उधळीत रंग,’ या अभंगाने तिने भावरम्य समारोप केला. उगीच चमत्कृतीच्या मोहात न पडता तिने शांत, तरल व संयमित सादरीकरण केले. तिला अजिंक्य गलांडे (तबला) व कार्तिक नसवले (तानपुरा) यांनी साथ केली.
उत्तरार्धात सानिकाने राग बिहारमध्ये विलंबित एकतालात ‘कैसे सुख सोवे,’ ही बंदिश, तिला जोडून अध्धा तालात ‘ले जा रे पथिकवा’ व आडा चौतालात पं. बळवंतराय भट्ट यांनी रचलेला तराणा तिने आशय खुलवत प्रस्तुत केला. प्रसिद्ध सरोदवादक पं. राजन कुलकर्णी हे सानिकाचे वडील. त्यांच्याकडून मिळालेले पाठ गिरवत तिने लालित्यपूर्ण प्रस्तुती केली. तिचा आदर्श असलेल्या विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांच्याप्रमाणे स्वरलगाव, रागविस्तारात बारकावे जपणे, आटोपशीर सरगम, परंपरा सांभाळून स्वतःचे चिंतन मांडणे यामुळे तिची मैफल श्रवणीय झाली. तिला अभिनय रवंदे (हार्मोनिअम) व आशय कुलकर्णी (तबला) यांनी साथ केली. सुरवातीला संस्थेचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविक केले. परिमला रानडे यांनी सूत्रसंचालन केले.