नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत कोणतेही निर्बंध नसल्याने तरुणाई उतरली रस्त्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत
कोणतेही निर्बंध नसल्याने तरुणाई उतरली रस्त्यांवर
नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत कोणतेही निर्बंध नसल्याने तरुणाई उतरली रस्त्यांवर

नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत कोणतेही निर्बंध नसल्याने तरुणाई उतरली रस्त्यांवर

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी यंदा कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नसल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली होती.

कोरोनानंतर पहिल्यांदाच ३१ डिसेंबरच्या रात्री कोरोनाविषयक कोणतेही नियम लागू करण्यात आले नव्हते. तरुणाईने मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता, एम. जी. रस्ता, कोरेगाव पार्क, विमाननगरसह उपनगरांतील महत्त्वाच्या रस्त्यांवर नववर्षाच्या स्वागत केले. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्ग्युसन रस्ता हा नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक) ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणि महात्मा गांधी रस्ता हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौकापर्यंत नो-व्हेईकल झोन करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही तरुणांनी दुचाकीवरून शहरात फेरफटका मारत जल्लोष केला. सोसायटीमधील रहिवाशांनीदेखील नवीन वर्षाच्या स्वागताचे नियोजन केले होते.

गेल्या वर्षी संचारबंदी
शहरात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या विचारात घेता नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असल्याने पुणेकरांनी गेल्यावर्षी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करण्यास पसंती दिली होती. २०२१ मध्ये रात्री नऊ ते सकाळी सहा दरम्यान लागू असलेल्या जमावबंदीमुळे अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले होते. त्यामुळे प्रत्यक्ष भेटणे शक्य न झाल्याने नागरिकांनी व्हर्च्युअल पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यंदा मात्र अनेकांनी प्रत्यक्ष भेटून आणि रस्त्यावर उतरून शुभेच्छा देण्यास पसंती दिली.

मद्यपींवर केली कारवाई
थर्टीफस्टच्या निमित्ताने वाहतूक शाखेने वेगळा बंदोबस्त केला होता. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यासाठी शहरातील विविध चौकांत वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. रविवारी पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीसाठी एक ब्लो पाइप वापरण्यात आला.

हॉटेलांत गर्दी
३१ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक हॉटेलचालकांनी विविध ऑफर जाहीर केल्या होत्या. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, क्‍लब आणि पबमध्ये आकर्षक सजावटदेखील केली होती. त्यामुळे हॉटेलांत मोठी गर्दी झाली होती. रात्री १२ नंतरदेखील अनेक हॉटेलांत गर्दीचा ओघ कायम होता.