समाजाला नवतुच्छतावादाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजाला नवतुच्छतावादाचा धोका
समाजाला नवतुच्छतावादाचा धोका

समाजाला नवतुच्छतावादाचा धोका

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘‘आज समाजासमोर नवतुच्छतावादाचा धोका उत्पन्न झाला आहे. ज्यांना ज्ञानार्जनाचे आकर्षण नाही, ग्रंथनिर्मितीचा अनुभव नाही आणि त्याचा आदरदेखील नाही, अशा शक्तींकडून बुद्धिवादाचा आणि बुद्धिवाद्यांचा उपहास केला जात आहे. महापुरुषांच्या अपमानापासून ते साहित्याच्या आणि साहित्यिकांचा अपमान, ही त्याचीच उदाहरणे आहेत. या शक्तींचे उर्मट भुभु:कार समाजाला हानीकारक ठरतील, सांस्कृतिक विश्वाला मागे ढकलतील,’’ असा इशारा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष भारत सासणे यांनी शुक्रवारी दिला.

काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानतर्फे सासणे यांना ‘कै. काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत गाडगीळ, विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले आदी उपस्थित होते.

सासणे म्हणाले, ‘‘साहित्य हा समाजाचा आरसा आहे, असे आपण म्हणतो. पण हे विधान कालबाह्य तर झाले नाही ना, हे तपासून पाहायला हवे. कारण साहित्य हा जर आरसा असेल तर भोवताली जे घडते आहे, त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. अनुभव मात्र वेगळा असतो. काही वास्तवाचे दर्शन साहित्यात होतच नाही. त्यामुळे साहित्याला आरशाची उपमा देताना विचार करावा लागेल.’’

बागाईतकर म्हणाले, ‘‘आज आपण समाज म्हणून भयावह दिशेने जात आहोत. एकीकडे समाज एकजूट असावा, असे आपण म्हणतो. पण याचा अर्थ समाजात विविधताच नसावी, असे नाही. आपल्या राज्यघटनेत प्राधान्य एकतेला नाही, विविधतेला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पण आज एकजिनसीपणाच्या, समरसतेच्या नावाखाली विविधता संपविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. आपण भारतातील शतकानुशतके पाळत आलेल्या मूलभूत तत्त्वांना धक्का लावण्याचे काम सुरू आहे. ही एक लढाईच आहे. या लढाईत वाङ्मयीन क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.’’

साहित्यिकाने किंवा कलावंतांनी एकवेळ सामाजिक विसंगतीवर भाष्य करावे, मात्र राजकीय भाष्य करू नये, असा एक आग्रह अलीकडे धरला जात आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या एका विधानासंदर्भात उमटलेल्या प्रतिक्रिया त्याचीच साक्ष देतात. अशा मर्यादा यापूर्वी देखील घातल्या गेल्या आहेत आणि आजही घातल्या जात आहेत.
- भारत सासणे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष