स्तुतीचा पट्टा सुरू केला सुंठी वाचून गेला खोकला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्तुतीचा पट्टा सुरू केला
सुंठी वाचून गेला खोकला!
स्तुतीचा पट्टा सुरू केला सुंठी वाचून गेला खोकला!

स्तुतीचा पट्टा सुरू केला सुंठी वाचून गेला खोकला!

sakal_logo
By

‘‘काय हो भाजी कशी झालीय?’’ सुनंदाने विचारले. ‘‘एकदम झकास! गेल्या कित्येक दिवसांत अशी भाजी मी खाल्ली नव्हती.’’ प्रभाकरने उत्तर दिले. ‘‘मग दिनेश का तोंड वाकडं करत होता. भाजीला अजिबात चव नाही, असं म्हणत होता?’’ सुनंदाने विचारले. ‘‘अजून तो लहान आहे. लग्न झाल्यानंतर तो सगळं शिकेल. घरात शांतता नांदण्यासाठी कधी काय बोलायचं असतं, हे त्याला त्यावेळी नक्की कळेल.’’ प्रभाकरने खुलासा केला.
‘‘भाजी तशी खारट लागतेय पण त्यात तुझा काही दोष नाही. कोपऱ्यावरील दुकानातून मी आणलेलं मीठ जास्त खारट आहे. हल्लीच्या मीठ बनवणाऱ्या कंपन्या मुद्दाम मीठ खारट बनवून, घरा-घरात भांडण लावून देत आहेत पण आपण त्याला बळी पडायचं नाही. खारट भाजीला मिठाची कंपनी जबाबदार आहे, एवढं नक्की.’’ प्रभाकरने म्हटले. ‘‘पण भाजी तिखट झाली नाही ना?’’ सुनंदाने विचारले. ‘‘अगं किती दिवस आपण मिळमिळीत भाज्या खाऊन, मिळमिळीत जगायचं. हल्ली काहीही झालं तरी डोळ्यांतून पाणी येतं का? त्यामुळे डोळे कोरडे पडतात. रडणं खरंच दुर्मिळ झालंय. मात्र, आजची भाजी खाताना डोळ्यांतून पाणी येत होते. किती दिवसांनी रडण्याचा आनंद घेतला. पुढच्या आठवड्यात तुझे आई-बाबा येणार आहेत. त्यांच्यासाठीही अशीच भाजी कर. त्यांचे डोळ्यांचे आजार पळून जातात की नाही बघ.’’ प्रभाकरने उत्तर दिले. ‘‘पण भाजी थोडी करपलेली आहे का?’’ सुनंदाने विचारले. ‘‘छे. छे. उलट करपलेली भाजी खाण्यात फार मजा आली. एक वेगळीच चव होती. हल्ली अशी चव मिळते कोठे? भाजी करपली, यात तसा तुझा काही दोष नाही. कढई फार जुनी झाल्याने भाजी करपली. त्यामुळे मी उद्याच नवीन कढई घेऊन येतो.’’ प्रभाकरने म्हटले. ‘‘पण चपात्या पण जळाल्या होत्या.’’ सुनंदाने म्हटले.
‘‘अगं तुझ्या सौंदर्याकडे बघून कोणी पण जळतंच गं. त्यात चपात्यांचं काय विशेष. तसाही सिलेंडर मी चुकीचा जोडला आहे. त्यामुळे शेगडीला व्यवस्थित गॅसपुरवठा होऊ शकला नसेल. यात तुझा काही दोष नाही.’’ प्रभाकरने खुलासा केला. ‘‘बटाट्याच्या सालीमध्येच सगळी जीवनसत्वे असतात, असा मेसेज मी कालच व्हॉटस अपवर वाचला होता. त्यामुळे बटाट्याची साल तू काढली नाहीस, हे फार चांगलं केलंस. सालदेखील तू वाया घालवत नाहीस, केवढा काटकसरीने तू स्वयंपाक करतेस. तसेच आमचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठीच सालीसकट बटाटा तू भाजीत टाकतेस, याची मला कल्पना आहे.’’ प्रभाकरने फायदे सांगितले. ‘‘पण भाजी कच्ची राहिली होती का?’’ सुनंदाने विचारले. ‘‘अगं आयुर्वेदात कच्च्या अन्नपदार्थांचे फायदे किती सांगितले आहेत. उलट माणूस जेवढं कच्चं खाईल, तेवढी त्याची प्रकृती उत्तम राहते. सॅलड कच्चं का खातात, हे त्यामागील कारण आहे आणि वाघ, सिंह यांना अन्न शिजवून खाताना तू कधी पाहिले आहेस का? कच्चं खाऊनच ते ताकदवान बनलेत. त्यामुळं तू भाजी कच्ची शिजवली, याचा मला फार आनंद झालाय.’’ प्रभाकरने म्हटले.
‘‘अय्या खरंच मी स्वयंपाक एवढा आरोग्यदायी करते? मी माहेरी स्वयंपाक केल्यानंतर ‘हिचं सासरी कसं होईल, कोणास ठाऊक?’ असं म्हणून आईची मी बोलणी खायची. पण तुमच्या बोलण्यावरून माझंच बरोबर होतं, हे मला पटलंय.’’ सुनंदाने म्हटले. ‘‘रोज स्वयंपाक करून तुझ्या कोमल आणि नाजूक हातांना किती त्रास होत असेल. त्यापेक्षा आपण स्वयंपाकाला एखादी बाई ठेवू. त्यामुळे सगळेच प्रश्न मिटतील.’’ प्रभाकरने म्हटले. ‘‘अय्या खरंच! तुम्ही माझी किती काळजी घेता.’’ असे म्हणून सुनंदा लाजली.