
मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई
पुणे, ता. ३१ : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केलेली आहे. रिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरिता मुदतवाढ देऊनही पुन:प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक, मालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
रिक्षा धारकांनी त्यांच्या रिक्षा भाडेमीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम मुदतीत न केल्याने, तसेच रिक्षा संघटनांकडून रिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरीता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याच्या सुरुवातीस १ ते ३० नोव्हेंबर आणि नंतर १ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने घेतला होता.
या मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करून न घेणाऱ्या रिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे. मीटर कॅलिब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान सात दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी एक दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये, मात्र किमान ५०० रुपये आणि कमाल तडजोड शुल्क दोन हजार रुपयांपर्यंत असेल. मीटर तपासणीचे काम फुलेनगर व आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सुरू राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.
५० हजार रिक्षाचालक रडारवर
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यात एक लाख २० हजाराहून अधिक रिक्षा आहेत. त्यातील सुमारे ६० टक्के रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशनचे काम पूर्ण झाले असावे, असा प्रशासकीय अंदाज आहे. त्यामुळे सुमारे ५० हजार रिक्षाचालक आता कारवाईच्या रडारवर आले आहेत.