
‘एएफएमसी’च्या परिषदेत विविध विषयांवर चर्चा
पुणे, ता. ४ : येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) आयोजित ७१ वी सशस्त्र दल वैद्यकीय परिषद आणि ६१ वी सशस्त्र दल वैद्यकीय संशोधन समितीची (एएफएमआरसी) बैठक नुकतीच संपन्न झाली. या तीन दिवसीय परिषदेत वैद्यकीय अधिकारी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि वैद्यकीय प्रशासकांनी आरोग्य सेवेतील महत्त्वाच्या तसेच उदयोन्मुख क्षेत्रांवर चर्चा केली. त्याचबरोबर सशस्त्र दल वैद्यकीय सेवांसाठी समर्पक संशोधनाबाबत मार्गदर्शन केले.
या परिषदेत सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) संदर्भात विस्तृत विषयांवर चर्चा करण्यात आली. सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे (डीजीएएफएमएस) महासंचालक आणि आर्मी मेडिकल कोअरचे वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. क्लिनिकल मेडिसिन, लष्करी औषधे आणि लढाऊ वैद्यकीय साहाय्य यासाठी सशस्त्र दल वैद्यकीय परिषद एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. यावर्षी ३८ नवीन संशोधन प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. तसेच सशस्त्र दलातील त्यांची प्रासंगिकता विचारात घेऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. परिषदेदरम्यान एएफएमएसच्या विविध प्रशिक्षण संस्थांमधील महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण विषयांवर चर्चा झाली. या बैठकीला एएफएमएसचे ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. तर नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), बीजे मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते तसेच मेजर जनरल पुनित यादव आणि ब्रिगेडियर बी हरिकृष्णन यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत पदव्युत्तर आणि सेवांतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान हा कार्यक्रम एएफएमसीचे अधिष्ठाता मेजर जनरल डी विवेकानंद यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.