
दुचाकीस्वाराची ट्रकला धडक; सहप्रवाशाचा मृत्यू
पुणे : मद्यप्राशन करून भरधाव दुचाकी चालविताना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. अमोल अशोक जाधव (वय ३५, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) असे मृत्यू पावलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी करण ऋषिराज कदम (वय २९, रा. नक्षत्र सोसायटी, नऱ्हे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. करण कदम देखील अपघातात जखमी झाला आहे. हा अपघात जवाहरलाल नेहरू रोडवरील रामोशी गेट पोलिस चौकी ते पेट्रोल पंपादरम्यान नऊ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हा मद्यप्राशन करून दुचाकीवर त्याचा मित्र अमोल जाधव याला घेऊन जात होता. भरधाव जाताना त्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात तो स्वत: जखमी झाला. त्याचा मित्र अमोल जाधव याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक अश्विनी पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.