
सावत्र आईकडून पाच वर्षांच्या मुलीचा खून
पुणे, ता. २५ : सावत्र आईने पाच वर्षांच्या मुलीला अंगावर चटके देऊन आणि डोक्यात मारहाण करून खून केल्याची घटना उत्तमनगर शिवणे भागात घडली. डॉक्टरांना संशय आल्यामुळे वैद्यकीय तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. श्वेता आनंद (वय ५) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सावत्र आई रितिका सुनील बक्षी उर्फ रितिका राजेश आनंद (वय ३५, रा. धावडे इमारत, अहिरे गेट, उत्तमनगर, शिवणे) हिला अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार आनंद घोलप यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेताचे वडील राजेश आनंद हे एका खासगी कंपनीत कामास आहेत. राजेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजेशने रितिकासोबत दुसरा विवाह केला. श्वेताला आईची आठवण आल्याने ती रडायची. त्याचा राग धरून रितिका तिला गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंगावर चटके देऊन मारहाण करीत होती. मारहाणीत श्वेता बेशुद्ध पडली. त्यामुळे घाबरून रितिकाने श्वेताला ससून रुग्णालयात दाखल केले. श्वेताला फिट आल्यामुळे ती बेशुद्ध पडल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले, परंतु उपचारापूर्वीच श्वेताचा मृत्यू झाला होता.
श्वेताच्या शरीरावर मारहाण आणि चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्या. डॉक्टरांना संशय आल्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वैद्यकीय तपासणीत श्वेताचा मृत्यू डोक्यात मारहाण झाल्याने आणि अंगावर चटके दिल्याने झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी रितिकाला ताब्यात घेतले. पुढील तपास उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर करीत आहेत.