
महिला दिनानिमित्त एडब्ल्यूडबल्यूएतर्फे कार्यक्रम
पुणे, ता. ७ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडबल्यूए)तर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एडब्ल्यूडबल्यूएच्या क्षेत्रीय अध्यक्षा सुबीना अरोरा यांच्यासह सर्व स्तरातील महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी महिला स्काय डायव्हिंगमध्ये (गगन भरारी) आठ वेळा विश्वविक्रम नोंदविणाऱ्या शीतल महाजन यांनी मांडलेला त्यांचा जीवन प्रवास कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. महाजन यांनी जगातील विविध खंडांमधून तसेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर गगनभरारीचा प्रयोग केला आहे. यानंतर डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या कलावर्धिनी मंडळाने शास्त्रीय नृत्य सादर केले. तसेच एडब्ल्यूडबल्यूएच्या व्यावसायिकांनी कार्यक्रमात सादर केलेलं विविधांगी हस्तकला प्रदर्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. वीर नारींच्या सत्काराने कार्यक्रमाची सांगता झाली.