गीतरामायण सादर करायचे असल्यास श्रेय द्या

गीतरामायण सादर करायचे असल्यास श्रेय द्या

पुणे, ता. १८ ः गीतरामायण या ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अजरामर कलाकृतीचे स्वामित्व हक्क (कॉपिराईट) अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडेच आहेत. त्यामुळे ज्या कलाकारांना गीतारामायण सादर करायचे असेल, त्यांनी कार्यक्रमांच्या जाहिरातीत आणि फलकांवर गदिमा व बाबूजींना श्रेय देणारा नामोल्लेख ठळकपणे करावा, अशी सूचना माडगूळकर कुटुंबीयांनी केली आहे.
गीतरामायणाचे स्वामित्व हक्क माडगूळकर कुटुंबीयांकडेच आणि त्याच्या संगीताचे स्वामित्व हक्क फडके कुटुंबीयांकडेच आहेत. हे हक्क २०६२ पर्यंत त्यांच्याकडचे राहणार आहेत. त्यामुळे कार्यक्रम सादर करताना ‘महाकवी ग. दि. माडगूळकर विरचित गीतरामायण’ असा उल्लेख असायलाच हवा. तसेच ‘संगीत - सुधीर फडके’, असा उल्लेख असणे आवश्यक आहे. योग्यरीतीने श्रेय न दिल्यास माडगूळकर कुटुंबीयांतर्फे त्या कार्यक्रमावर स्वामित्व हक्क कायद्यामार्फत आक्षेप घेतला जाईल, असेही माडगूळकर कुटुंबीयांनी सांगितले.
याबाबत गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले, ‘‘कलाकारांनी कार्यक्रम करण्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. हे कलाकार गदिमांचे गीतरामायण पुढील पिढीपर्यंत नेत आहेत, याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र गदिमांच्या नावाचा उल्लेख जाहिरातीत व कार्यक्रमात नसल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. गदिमा व सुधीर फडके यांना त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे.’’

गीतरामायणाचे भारतात व परदेशात मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ अशा अनेक भाषांत रूपांतरित केलेले कार्यक्रम होत असतात. मात्र हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबूजी नावाचा उल्लेख न करता अतिशय वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत. त्यासाठी ही सूचना केली आहे.
- सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com