‘अभिषेकी’ महोत्सवाचा सुरेल प्रारंभ

‘अभिषेकी’ महोत्सवाचा सुरेल प्रारंभ

पुणे, ता. २४ : हेमंत पेंडसे यांची दमदार गायकी... सुब्रतो डे यांचा सतारवरील मोहून टाकणारा स्वराविष्कार आणि सरतेशेवटी वयाच्या नव्वदाव्या वर्षी तरुणांनाही लाजवणाऱ्या उत्साहात स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी रंगवलेली मैफल... अशा त्रिवेणी संगमाने १६ व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. शास्त्रीय संगीतातील अजरामर आणि सदाबहार सुरांचे गारूड रसिकांनी पहिल्या दिवशी अनुभवले.

तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ यांच्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. विनायक तोरवी, पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी, महोत्सवाचे संयोजक महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, महेश पानसे, विव्देश रामदासी आदी उपस्थित होते. ‘अशा प्रकारचे महोत्सव घेणे हा कर्तव्याचा भाग असून अशा महोत्सवांच्या माध्यमातून गुरूंच्या पुनर्भेटीचा आनंद प्राप्त होतो’, असे पं. तोरवी यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना ‘पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार’ आणि युवा गायक आदित्य खांडवे यांस ‘पं. जितेंद्र अभिषेक स्मृती युवा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

उद्‍घाटनाच्या दिवशी पहिल्या सत्रात अभिषेकी बुवांचे शिष्य पं. हेमंत पेंडसे यांचे गायन झाले. त्यांनी राग मधुवंती आणि राग हमीर सादर केला. ‘आधी रचिली पंढरी’ या भजनाने त्यांनी सादरीकरणाची सांगता केली. त्यांना तबल्यावर सुभाष कामत, संवादिनीवर उदय कुलकर्णी आणि तानपुऱ्यावर यश कोल्हापुरे यांनी साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात सुब्रतो डे यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग किरवाणी प्रस्तुत केला. अजिंक्य जोशी यांनी त्यांना साथसंगत केली.

मधुरकंस राग सादर
पहिल्या दिवसाचे अखेरचे पुष्प किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी गुंफले. त्यांनी प्रारंभी राग कौशिकरंजनी आणि त्यानंतर मधुरकंस हा स्वनिर्मित राग सादर केला. त्यांना तबल्यावर पांडुरंग मुखडे, संवादिनीवर राहुल गोळे आणि तानपुऱ्यावर आरती कुंडलकर व अश्विनी मोडक यांनी साथ दिली.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड : येथे आयोजित १६ व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात सादरीकरण करताना ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com