
आयएनएस शिवाजीचा दीक्षांत समारंभ उत्साहात
पुणे, ता. ७ : लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या सागरी अभियांत्रिकीच्या प्रशिक्षण संस्थेतील ‘व्यावसायिक प्रशिक्षण तुकडीचा’ दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. या वेळी दीक्षांत संचलनाची पाहणी आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर मोहित गोयल यांनी केली.
नौदल आणि तटरक्षक दलाच्या ‘डायरेक्ट एंट्री इंजिनिअरिंग मेकॅनिकचे’ (डीईएमई) २५ आणि ‘डायरेक्ट एंट्री डिप्लोमा होल्डर’ (डीईडीएच) या अभ्यासक्रमातील २१ प्रशिक्षणार्थीं यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. प्रशिक्षणादरम्यान या प्रशिक्षणार्थींना सागरी अभियांत्रिकी उपकरणांच्या देखभालीची व त्याचा वापर याबाबत माहिती देण्यात आली. तसेच क्रीडा, साहसी उपक्रम, संचलन आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कालावधीत उत्तीर्ण कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात डीईएमई अभ्यासक्रमात साहिल सिंघल यांनी आणि डीईडीएच अभ्यासक्रमात रणजित कुमार यांनी प्रथम क्रमांक मिळविले.